Headlines

धाराशिवमध्ये तानाजी सावंत आणि मोटेंच्या समर्थकांमध्ये तुफान राडा:10 ते 12 गाड्यांची तोडफोड, 45 जणांवर गुन्हा दाखल




राज्यात तीन पक्षांच्या महायुतीचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवर काही नेत्यांमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथे शिवसेना नेते तथा आमदार तानाजी सावंत आणि राष्ट्रवादीचे नेते राहुल मोटे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोमवारी मध्यरात्री तुफान राडा झाला. दोन्ही बाजूंचे समर्थक आपापसात भिडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या संघर्षामध्ये दोन्ही गटांकडून जोरदार दगडफेक करण्यात आली. या हिंसाचारात इनोव्हा, फॉर्च्युनर आणि थार यांसारख्या 10 ते 12 महागड्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत राहुल मोटे यांचा पराभव करून तानाजी सावंत आमदार झाले होते, तेव्हापासूनच या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. यापूर्वीही दोन्ही गटांतील वादाचे पडसाद अनेकदा पाहायला मिळाले आहेत. दोन्ही गटांचे एकमेकांवर गंभीर आरोप जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयानंतर आमदार तानाजी सावंत गटाचा उन्माद सुरू असून त्यातूनच हा हल्ला झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे, विधानसभा आणि जिल्हा परिषदेतील पराभव पचवता न आल्यानेच प्रस्थापितांकडून हे राजकारण केले जात असल्याचे सावंत गटाने म्हटले आहे. राहुल मोटे यांच्या सांगण्यावरूनच हा वाद उकरून काढला जात असून, राष्ट्रवादीने स्वतःच्याच गाड्या फोडून आमच्यावर खोटे आरोप केल्याचा दावाही सावंत गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. पोलिसांकडून शोध मोहीम सुरू या गंभीर घटनेनंतर दोन्ही गटांतील कोणत्याही बाजूने परस्परविरोधी अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत कारवाई केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी 45 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींची धरपकड व शोध मोहीम वेगाने सुरू केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *