![]()
स्वातंत्र्यदिनाचा ध्वजवंदनाचा कार्यक्रम आटोपून घरी परतताना रस्ता ओलांडत असताना दुचाकीला टेम्पोने दिलेल्या धडकेत शिक्षक ठार झाले. हा अपघात शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ढवळस पाटी चौकात घडला. या अपघातात जय जगदंबा विद्यालय ढवळस (ता. माढा) येथील सहशिक्षक संजय बाळकृष्ण कांबळे (रा. भोसरे, ता. माढा) यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी (दि. १५) रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शाळेतील ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर मुख्याध्यापक श्रीहरी कापसे, शिक्षक नेताजी घोरपडे आणि सहशिक्षक संजय कांबळे हे आपापल्या दुचाकीवरून कुर्डुवाडीकडे निघाले होते. ढवळस पाटी चौकात कुर्डुवाडी-करमाळा रस्ता ओलांडत असताना कुर्डुवाडीकडून करमाळ्याच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पोने (एमएच ०४ एफयू ५७८५) संजय कांबळे यांच्या दुचाकीला (एमएच ४५ एवाय ५८३८) जोरदार धडक दिली. या धडकेमुळे कांबळे हे रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात फेकले गेले. यामुळे कांबळे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. ते जागीच बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने कुर्डुवाडी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक श्रीहरी कापसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालका अरविंद भांगे (रा. शेटफळ, ता. माढा) याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. पोलिस तपास करत आहेत.
Source link
ध्वजारोहणानंतर परतताना टेम्पोच्या धडकेत शिक्षक ठार:कुर्डुवाडी-करमाळा रस्त्यावर ढवळसपाटीजवळ अपघात