Headlines

नऊ महिन्यांच्या बालकाच्या तोंडात फेव्हिक्विक ओतले:कौटुंबिक वादातून भावजयीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, उपचार सुरू




पुण्यात कौटुंबिक वादातून नऊ महिन्यांच्या बालकाच्या तोंडात फेव्हिक्विक ओतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बालकाच्या तोंडात अंतर्गत जखमा झाल्या असून, त्याच्यावर ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. लोहगाव पोलिसांनी या प्रकरणी बालकाच्या भावजयीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अल्ताफ नबी शेख (वय ३९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सानिया शेख (रा. कलवड वस्ती, लोहगाव), रियाज इमाम हल्याळ (वय ४८) आणि हाजी मलंग शेख (दोघे रा. मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्ताफ शेख आणि त्यांचा भाऊ लोहगावमधील कलवड वस्तीत एकत्र राहतात. त्यांच्या कुटुंबात किरकोळ कारणांवरून वाद सुरू होते. ३१ जुलै रोजी दुपारी १२ च्या सुमारास अल्ताफ यांच्या नऊ महिन्यांच्या मुलाच्या तोंडात भावजय सानियाने फेव्हिक्विक ओतले. या प्रकारामुळे बालकाच्या तोंडात गंभीर अंतर्गत जखमा झाल्या. अल्ताफ यांची पत्नी जैनब यांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्यांनी तात्काळ कामावर असलेल्या पती अल्ताफ यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर बालकाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. जैनब यांनी आरोपी सानियाला जाब विचारला असता, तिने हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर सानियाचे मुंबईतील नातेवाईक रियाज हल्याळ आणि हाजीमलंग शेख रुग्णालयात आले. त्यांनीही जैनब यांना, सानियाविरुद्ध पोलीस तक्रार दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले करत आहेत. लोहगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी सांगितले की, बालकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *