Headlines

नक्षत्र संगीत अकादमीचे संगीत प्रशिक्षण:गाणं हा केवळ मनोरंजनाचा भाग नाही तर तो आत्मसंवाद – डॉ. वैशाली देशमुख




‘गाणं म्हणजे केवळ मनोरंजनाचा भाग नाही, तर तो एक आत्मसंवाद आहे,’ असे प्रतिपादन शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली देशमुख यांनी केले. छत्रपती संभाजीनगर, नक्षत्र संगीत अकादमी आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहा दिवसीय संगीत प्रशिक्षण शिबिराचा समारोप डॉ. देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये झाला. यावेळी त्या बोलत होत्यात. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी केंद्राचे कार्याध्यक्ष डॉ. मच्छिंद्र गोर्डे हे अध्यक्षस्थानी होते. शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना डॉ. वैशाली देशमुख म्हणाल्या की, ‘संगीत हे केवळ मनोरंजनासाठी नसून, मनोरंजन हा त्याचा एक भाग आहे. गाण्यातील आम्हा लोकांसाठी गाणं हे आत्मसंवाद करण्यासाठी आहे. गुरू आणि शिष्य यांच्या माध्यमातून हा संवाद होत राहतो. जसे गुरुशिवाय शिष्यांचे गाणे विकसित होत नाही, तसेच गुरूंचेही गाणं विकसित होण्यासाठी शिष्यांची आवश्यकता असते. संगीतामुळे शिक्षणातील एकाग्रता वाढते. त्यामुळे ज्यांना गाण्याची ओढ आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी संगीत शिकावे’. शिबिरात शिबिरार्थींना शास्त्रीय संगीताची ओळख म्हणून अलंकार, राग, बंदिश, तराना, सरगम गीत आणि विविध ताल यांची माहिती दिली. यासह सुगम गीत या प्रकारात भावगीत गझल आणि भक्ती गीत यांचे प्रशिक्षण दिले गेले, समूहगीत या कला प्रकारात देशभक्तीपर गीत, इंग्रजी समूहगीत यांचे प्रशिक्षण दिले गेले, लोकसंगीत कलाप्रकारात दोन शेतकरी गीतांचे प्रशिक्षण दिले गेले, सर्व वाद्यांची ओळख करून दिली गेली, तर जुन्या नव्या गाण्यांचे मॅशप आणि कराओके यांचा देखील सराव करून घेण्यात आला. शिबिरात विविध वयोगटातील एकूण पंचवीस शिबिरार्थींनी सक्रियपणे सहभाग नोंदवला होता. या शिबिरार्थींना डॉ. अमरजीत बाहेती आणि डॉ. समाधान इंगळे यांनी प्रशिक्षण दिले. या सोबतच सहभागी शिबिरार्थी यांची कराओके गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण देवगिरी महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख डॉ. तुकाराम वांढरे यांनी केले. यावेळी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन तसेच सर्व शिबिरार्थींना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबिरार्थी नभा इंगळे हिने केले. प्रास्ताविक नक्षत्र संगीत अकादमीच्या संचालक डॉ. अमरजीत बाहेती यांनी, तर आभार शिबिरार्थी असीम टाकसाळ ह्याने मानले. यावेळी ॲड. अभय टाकसाळ, कवी सुनील उबाळे, डॉ. मानसी बाहेती, राजेश शिरपूरकर, दिव्य तौर आदींची उपस्थिती होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *