![]()
धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर अकोट नगरपरिषदेत शहर विकासाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांच्या हस्ते या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले तसेच विविध योजनांतील लाभार्थींना लाभांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थींना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. तसेच पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी एक लाख रुपयांच्या अनुदानाचे धनादेश वितरित करण्यात आले. याशिवाय नवीन पात्र लाभार्थींना घरकुल बांधकाम परवानगीचे आदेशही देण्यात आले. अकोट नगरपरिषदेची इमारत दोन मजली असून मुख्याधिकाऱ्यांचे दालन पहिल्या मजल्यावर, तर इतर प्रशासकीय विभाग दुसऱ्या मजल्यावर कार्यरत आहेत. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांना जिने चढताना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या दूर करण्यासाठी आमदार भारसाकळे यांनी इमारतीत लिफ्ट बसवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पूर्ण झालेल्या अत्याधुनिक लिफ्टचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधेमुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांची मोठी सोय होणार आहे. याच सोहळ्यात नगर परिषदेला शासनाकडून प्राप्त झालेल्या आधुनिक सफाई मशीनचेही फीत कापून उद्घाटन करण्यात आले. या यंत्रामुळे शहरातील स्वच्छता मोहिमेला गती मिळून स्वच्छता प्रभावीपणे होण्यास मदत होईल. यावेळी नगराध्यक्षा, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती, नगरसेवक, मुख्याधिकारी, अधिकारी-कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते. यामुळे हा सोहळा उत्साहात पार पडला.
Source link
नगर परिषदेत विकासकामांचे लोकार्पण