Headlines

नवापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव:जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टींकडून बाधित क्षेत्राची पाहणी; 44 हजार पक्षी आणि 39 हजार अंडी नष्ट




नवापूर तालुक्यातील तीन पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर होऊन तब्बल 72 तास उलटल्यानंतर, अखेर नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी बाधित क्षेत्राची पाहणी केली. दरम्यान त्या कार्यालयातून नवापुरातील बर्ड फ्लूचा आढावा घेत होत्या. रविवारी सुट्टी असताना देखील जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी सुट्टीच्या दिवशी पाहणी करण्यासाठी आल्या. या दरम्यान त्यांनी सुरू असलेल्या कलिंग ऑपरेशनची माहिती जाणून घेतली. पशुसंवर्धन विभागाशी चर्चा केली तसेच पोल्ट्री व्यवसायिकांची देखील हितगुज केली. बर्ड फ्लू आजारावर कसं नियंत्रण मिळवता येईल याबाबत त्या सतर्क आहेत. नवापूर शहर व परिसरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव तीव्र होत असून, गेल्या दोन दिवसांत दोन पोल्ट्री फार्ममधील मोठ्या प्रमाणावर कुक्कुट पक्षी, अंडी व पशुखाद्य नष्ट करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने आतापर्यंत सुमारे 44 हजार 665 कुक्कुट पक्षी, 39 हजार 380 अंडी तसेच सुमारे 58 हजार किलो पशुखाद्य नष्ट केले आहे. आज तिसऱ्या दिवशीदेखील कलिंग (culling) ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी नवापूर शहरालगत असलेल्या तीन टेंबा परिसरातील ‘डॉन पोल्ट्री’ फार्मला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पशुसंवर्धन विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईची सविस्तर माहिती घेतली. कलिंग प्रक्रियेदरम्यान घेतली जाणारी काळजी, जैवसुरक्षा उपाययोजना तसेच संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची त्यांनी तपासणी केली. डॉ. शेट्टी यांनी विशेषतः पोल्ट्री चालकांना दिल्या जाणाऱ्या नुकसानभरपाई संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बाधित पक्षी, अंडी व पशुखाद्य नष्ट केल्याबदल्यात शासनाकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीची प्रक्रिया जलद व पारदर्शक ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, महसूल विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस प्रशासन उपस्थित होते. प्रशासनाकडून परिसरात सतर्कता वाढविण्यात आली असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित परिसरात निर्बंध लागू करण्यात आले असून, पोल्ट्री व्यवसायिकांना आवश्यक त्या सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून, पुढील काही दिवसांतही कलिंग ऑपरेशन सुरू राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *