Headlines

नवापूरमधून पंढरपूरसाठी थेट बससेवा सुरू:अमरावती स्थानकात पहिली बुकिंग, 44 भाविकांचा गट सज्ज




अमरावती: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) थेट गावातून बससेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत अमरावती बसस्थानकात पहिली बुकिंग झाली असून, अमरावती तालुक्यातील नवापूर येथून ४४ भाविकांचा एक गट पंढरपूरकडे रवाना होणार आहे. पायी वारी करणे शक्य नसलेल्या किंवा कुटुंबासह/समूहाने प्रवास करू इच्छिणाऱ्या भाविकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गाव किंवा परिसरातील किमान ४४ प्रवाशांचा गट तयार झाल्यास, एसटी महामंडळ थेट त्या गावातून पंढरपूरसाठी बस उपलब्ध करून देते. यामुळे भाविकांना बसस्थानकापर्यंत येण्याची गरज भासणार नाही. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या भाविकांना या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी, प्रवाशांनी आपल्या गावातील किंवा परिसरातील किमान ४४ प्रवाशांचा गट तयार करून जवळच्या एसटी बसस्थानक किंवा आगारात संपर्क साधावा. प्रवासाची तारीख आणि ठिकाण निश्चित करून बस आरक्षित करता येते. यासाठी कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नाही. एसटी महामंडळाच्या सहायक वाहतूक अधीक्षक कमल वानखडे यांनी सांगितले की, पंढरपूरला पोहोचल्यानंतर परतीच्या प्रवासाचे नियोजनही करता येते. त्यासाठी पंढरपूर येथील बसस्थानकात आगाऊ बुकिंग करावी लागेल. परतीच्या प्रवासाची माहिती तेथील बसस्थानकात दिल्यास, भाविकांना पंढरपूरहून थेट आपल्या गावात परतता येईल. यात्रेदरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेटीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, प्रवास भाड्याच्या सवलतीही लागू राहतील. महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत मिळेल, तर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना नियमानुसार सवलतीचा लाभ घेता येईल. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. अमरावती आगारातून या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत असून, भाविकांकडून सातत्याने चौकशी केली जात आहे. नवापूर येथून आरक्षित करण्यात आलेली ही विशेष बस १७ किंवा १८ जुलै रोजी पंढरपूरकडे रवाना होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सहायक वाहतूक अधीक्षक कमल वानखडे यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *