Headlines

शेतकऱ्यांना सिंचन अनुदानासाठी स्वहिस्सा देण्याची गरज नाही:'सेंट्रल बँक डिजिटल चलन' प्रणालीद्वारे थेट वितरण, लाभ घेणे सोपे




नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (टप्पा-२) राज्यातील ७ हजार २०१ गावांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व महिला शेतकऱ्यांना आता ठिबक व तुषार सिंचनाचे अनुदान थेट ‘सेंट्रल बँक डिजिटल चलन’ (सीबीडीसी) या डिजिटल प्रणालीद्वारे वितरित केले जाईल. या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना सिंचन संच खरेदीसाठी आपला स्वहिस्सा आधीच जमा करण्याची गरज राहणार नाही, ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक, नागपूर आणि चंद्रपूर येथील यशस्वी प्रयोगांनंतर आता अमरावतीसह सर्व प्रकल्प जिल्ह्यांमध्ये ही पद्धत लागू करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने चालणाऱ्या या प्रकल्पात पूर्वी ‘बॅक-एंडेड सबसिडी’ पद्धत होती. यामुळे शेतकऱ्यांना सुरुवातीला स्वतःच्या खिशातून पूर्ण रक्कम खर्च करून सिंचन संच खरेदी करावा लागत असे. भांडवलाच्या अभावामुळे अनेक अल्पभूधारक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत होते. ही अडचण दूर करण्यासाठी शासनाने ‘सीबीडीसी’ आधारित ‘फ्रंट एंडेड’ प्रणाली लागू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर सुरुवातीला पैसे उभारण्याचा आर्थिक ताण पडणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी डीबीटी पोर्टलवर अर्ज करताना ‘पी-सीबीडीसी’ हा पर्याय निवडणे आवश्यक आहे. त्यानंतर ‘पीएनबी डिजिटल रुपी ॲप’ डाऊनलोड करावे लागेल. पूर्वसंमती मिळाल्यावर शेतकऱ्यांच्या डिजिटल वॉलेटमध्ये अनुदानाच्या रकमेइतके डिजिटल टोकन जमा होतील. हे डिजिटल टोकन अधिकृत विक्रेत्याकडे क्यूआर कोडद्वारे स्कॅन करून वापरता येतील. शेतकऱ्यांना केवळ उर्वरित रक्कम भरून सिंचन संच खरेदी करता येईल. यासाठी त्यांना बँकेत स्वतंत्र खाते उघडण्याचीही गरज नाही. प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण झाल्यावर अनुदानाची अंतिम रक्कम विक्रेत्याच्या खात्यात जमा केली जाईल. ही सुरक्षित आणि पारदर्शक डिजिटल प्रणाली सूक्ष्म सिंचनाचा प्रसार वेगाने वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अर्चना निस्ताने यांनी पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *