![]()
पन्हाळा तालुक्यातील काखे येथील शाहूनगर वसाहतीत भरदिवसा घडलेल्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. घरात एकट्या असलेल्या पूजा दाभाडे यांच्यावर त्यांच्या चुलत दिराने धारदार शस्त्राने तब्बल 16 वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या पूजांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, आरोपी फरार आहे. काखे (ता. पन्हाळा) येथील शाहूनगर वसाहतीमध्ये बुधवारी (दि. 2) दुपारी एकच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पूजा अविनाश दाभाडे (वय 32/33) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांच्या चुलत दिरावर, सुरेश मधुकर दाभाडे (वय 35) याच्यावर हल्ल्याचा आरोप असून, घटनेनंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. भरदिवसा घराच्या दारात झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरात एकटी असल्याची संधी साधून हल्ला पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूजा दाभाडे बुधवारी दुपारी घरात एकट्या होत्या. त्यावेळी सुरेश दाभाडे तेथे आला. काही जुन्या कारणांवरून दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. पूजा घराच्या दारात आल्यानंतर सुरेशने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यांच्या हात, पाय आणि पोटावर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात पूजा गंभीर जखमी झाल्या. जीव वाचविण्यासाठी त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तसेच आरडाओरडा सुरू केला. मात्र, हल्ला करून आरोपी तेथून पसार झाला. पूजांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक आणि शेजारी घटनास्थळी धावून आले. त्यावेळी त्या गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी कोडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मोठ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. काही महिन्यांपूर्वी छेडछाडीचा गुन्हा दाखल या प्रकरणाला पूर्वीच्या वादाची पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी पूजा दाभाडे यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याच्या आरोपावरून संशयित सुरेश दाभाडे याच्याविरोधात कोडोली पोलिस ठाण्यात छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणाच्या रागातून हा हल्ला झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, खुनाचे नेमके कारण आरोपीच्या अटकेनंतर आणि पोलिस तपासातच स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. काही ठिकाणी या प्रकरणाबाबत अनैतिक संबंधांच्या संशयाचाही उल्लेख केला जात असला तरी, पोलिस तपास पूर्ण होण्यापूर्वी खुनाचे नेमके कारण निश्चितपणे सांगता येणार नाही. आरोपीला अटक होईपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नकार घटनेनंतर पूजा दाभाडे यांच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. आरोपीवर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. त्याच्यावर वेळीच कठोर कारवाई झाली असती, तर हा प्रकार घडला नसता, असा आरोपही करण्यात आला. आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाइकांनी घेतला. त्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपीच्या शोधासाठी दोन पथके रवाना हल्ल्यानंतर फरार झालेल्या सुरेश दाभाडे याच्या शोधासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. कोडोली पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची अशी दोन विशेष पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. शाहूवाडी विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. तसेच आरोपीचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना तपास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सहायक पोलिस निरीक्षक चेतन मसतुगे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पती आणि दोन मुलांचा आधार हरपला पूजा दाभाडे यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. भरदिवसा घराच्या दारात झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी नातेवाइकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या हत्येमागील नेमके कारण काय, आरोपीने हा हल्ला पूर्वनियोजितपणे केला होता का आणि पूर्वीच्या वादाशी या हत्येचा नेमका संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. हेही वाचा.. पुण्यात वाद, पण नागपुरात DJ वर थेट बंदी:1 नोव्हेंबरपर्यंत डीजे अन् लेझर लाईट पूर्णपणे बॅन; पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय गणेशोत्सवात एकीकडे पुण्यात डीजेवर प्रतिबंधाचा मागणी होत असताना आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषण आणि लेझर लाईटमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याची गंभीर दखल घेत नागपूर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर शहरात डीजे, डॉल्बी साऊंड, मॉडिफाइड साऊंड सिस्टिम, डीजेची वाहने तसेच बीमलाईट आणि लेझर बीमलाईटच्या वापरावर 1 नोव्हेंबरपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.सविस्तर वाचा..
Source link
पन्हाळा हादरला! घराच्या दारातच वहिनीवर धारदार शस्त्राने 16 वार:उपचारादरम्यान मृत्यू, आरोपी फरार