Headlines

बार्टी पीएचडी विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित:न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेले आंदोलन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर थांबवले




डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांनी पुण्यात सुरू केलेले आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. हे उपोषण न्याय्य हक्कांसाठी सरसकट फेलोशिप मिळावी या मागणीसाठी समाजकल्याण आयुक्त कार्यालयासमोर सुरू होते. प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी हा निर्णय घेतला. बार्टीच्या निबंधक सुचिता शिंदे आणि जात पडताळणी विभागाचे उपायुक्त संजय कदम यांच्या उपस्थितीत आंदोलक विद्यार्थ्यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडले. गेल्या अनेक दिवसांपासून बार्टीचे विद्यार्थी आंदोलन करत होते. त्यांची मुख्य मागणी ३० ऑक्टोबर २०२३ चा शासन निर्णय रद्द करण्याची होती. तसेच, २०२३, २०२४ आणि २०२५ मधील सर्व पात्र संशोधकांना पूर्वलक्षी प्रभावाने कोणताही अन्याय न करता सरसकट फेलोशिप मिळावी, अशी त्यांची मागणी होती. या आंदोलनाची प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर दखल घेण्यात आली. या आंदोलनानंतर शासकीय पातळीवर सकारात्मक हालचाली सुरू झाल्या. मुंबईत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या घरी आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनचे मार्गदर्शक राहुल डंबाळे आणि सचिव राहुल नागटिळक यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत राहुल डंबाळे आणि राहुल नागटिळक यांनी मांडलेल्या कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा झाली. मंत्र्यांनी आश्वासन दिले की, ३० ऑक्टोबर २०२३ पूर्वी नोंदणी झालेल्या २०२३ च्या विद्यार्थ्यांना २०२२ च्या निकषानुसार सरसकट फेलोशिप दिली जाईल. त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने नियम लागू केले जाणार नाहीत. याच दरम्यान, बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ-मुंडे यांनी शासनाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिले. त्यांनी ‘सारथी’ आणि ‘महाज्योती’ प्रमाणेच विद्यार्थ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने अन्याय न करता सरसकट फेलोशिप मंजूर करण्याची शिफारस मंत्रालयाकडे केली. मंत्रालयातून आणि बार्टी प्रशासनाकडून मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक पाऊले उचलली जात असल्याचे अधिकृत पत्र मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आज आंदोलनस्थळी बार्टी निबंधक सुचिता शिंदे आणि अधिकारी संजय कदम यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. प्रमुख उपोषणार्थी संशोधक विद्यार्थी सुरेखा वासनिक, किरण देवकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मान्यवरांच्या हस्ते लिंबू पाणी आणि ज्यूस घेऊन उपोषण संपवले. पुण्यातील उपोषण स्थगित झाले असले तरी विद्यार्थ्यांचा लढा अजून संपलेला नाही. २०२४ आणि २०२५ च्या विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा प्रश्न सोडवण्यासाठी आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनचे मार्गदर्शक राहुल डंबाळे यांनी पुढील आंदोलनाची घोषणा केली आहे. ९ सप्टेंबरपासून मुंबईत हे आंदोलन सुरू होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *