![]()
गडचिरोलीतील नक्षलवादी चळवळीत सक्रिय राहिलेल्या मल्लोजुला वेणुगोपाल राव ऊर्फ भूपती यांची गोंडवाना विद्यापीठात प्रशासकीय समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला नागपूरच्या ‘जन संघर्ष समिती’ने कडाडून विरोध केला आहे. समितीने म्हटले आहे की, आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र, महत्वाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय पदावर जबाबदारी देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या भूतकाळातील प्रकरणांची आणि कायदेशीर स्थितीची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. जन संघर्ष समितीने म्हटले आहे की, गेल्या चार दशकांत गडचिरोलीतील आदिवासी समाजाने नक्षली हिंसेची मोठी किंमत मोजली आहे. अनेक कुटुंबांनी आपली माणसे गमावली असून, अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. अशा परिस्थितीत गंभीर हिंसक कृत्यांचे आरोप असलेल्या व्यक्तीला आदिवासींच्या घटनात्मक अधिकारांबाबत मार्गदर्शनाची जबाबदारी देणे अयोग्य आहे. हा प्रश्न केवळ एका नियुक्तीचा नसून शहीद जवानांच्या कुटुंबांच्या दुःखाचा आणि नक्षली हिंसेचे बळी ठरलेल्या आदिवासींना न्याय मिळण्याचा आहे. गोंडवाना विद्यापीठ हे आदिवासी समाजाच्या शिक्षणाचे आणि भविष्याचे केंद्र मानले जाते. त्यामुळे अशा महत्वाच्या पदांवर नियुक्ती करताना पारदर्शकता, कायदेशीर तपासणी आणि लोकांप्रति जबाबदारी असणे खूप महत्वाचे आहे. जन संघर्ष समितीने मागणी केली आहे की, भूपती यांच्या नियुक्तीचा तातडीने पुनर्विचार करावा. त्यांच्यावर गंभीर गुन्हे किंवा न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असल्यास ही नियुक्ती रद्द करावी. संविधानाच्या नियमांनुसारच आदिवासींच्या हक्कांसाठी लढा सुरू राहील, असा इशाराही समितीने दिला आहे.
Source link
नागपुरात आत्मसमर्पीत नक्षली भूपतींच्या नियुक्तीला विरोध:गोंडवाना विद्यापीठात प्रशासकीय समन्वयक पदावर नियुक्ती; जन संघर्ष समितीने फेरविचाराची मागणी केली