Headlines

ध्वनिप्रदूषणावर बोलणाऱ्या कार्यकर्त्याला मारहाण, धमकी:महाराष्ट्र अंनिसकडून तीव्र निषेध, पोलिसांना कठोर कारवाईची मागणी




पुण्यातील टिळक रोड परिसरात सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना मारहाण करून धमकी दिल्याच्या घटनेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) तीव्र निषेध केला आहे. बापट हे ध्वनीप्रदूषणाच्या प्रश्नावर एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. अंनिसचे मिलिंद देशमुख आणि नंदिनी जाधव यांनी सांगितले की, ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न कोणत्याही एका धर्माचा, उत्सवाचा किंवा व्यक्तीचा नाही. तो नागरिकांचे आरोग्य, शांततेने जगण्याचा अधिकार आणि कायद्याचे पालन याच्याशी संबंधित आहे. या प्रश्नावर मतभेद असल्यास युक्तिवाद, चर्चा आणि लोकशाही मार्गाने उत्तर देता येते. एखाद्याच्या भूमिकेला उत्तर देता येत नसेल म्हणून त्याच्यावर हात उचलणे, धक्काबुक्की करणे किंवा धमकावणे हा लोकशाही मूल्यांवर हल्ला आहे, असे देशमुख यांनी म्हटले. बापट यांच्या भूमिकेशी मतभेद असल्यास ते तथ्यांच्या आधारे मांडावेत. मुद्दे खोडता येत नसतील तर हिंसेचा आधार घेणे ही धोकादायक प्रवृत्ती आहे. आज ध्वनीप्रदूषणाविरोधात बोलणाऱ्या व्यक्तीवर हात उचलला जात असेल, तर उद्या कोणताही नागरिक अन्याय, अंधश्रद्धा, प्रदूषण, भ्रष्टाचार किंवा सार्वजनिक गैरप्रकारांविरोधात आवाज उठवण्यास घाबरेल, अशी भीती अंनिसने व्यक्त केली. मतभिन्नतेला हिंसेने उत्तर देण्याची संस्कृती महाराष्ट्राच्या सामाजिक आणि परिवर्तनवादी परंपरेला मान्य नाही, असा महाराष्ट्र अंनिसचा ठाम विश्वास आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन पुणे पोलिसांनी निष्पक्ष आणि सखोल तपास करावा, अशी मागणी अंनिसने केली आहे. हल्ला, धक्काबुक्की, धमकी किंवा इतर कायदेशीर गुन्हे सिद्ध झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. या घटनेमागे आणखी कोणी सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास त्यांचीही चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, असेही अंनिसने म्हटले आहे. अशा घटनांमध्ये केवळ अटक करून प्रकरण संपू नये, तर कायद्याचे राज्य दिसेल अशी प्रभावी कारवाई होणे गरजेचे आहे. सामाजिक किंवा राजकीय दबावामुळे हिंसेचा मार्ग स्वीकारूनही काहीही परिणाम भोगावा लागणार नाही, असा संदेश समाजात जाता कामा नये, असे अंनिसने स्पष्ट केले. शासन आणि पोलीस प्रशासनाने या घटनेत कायद्याची कडक अंमलबजावणी करून एक स्पष्ट संदेश द्यावा. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणाऱ्या आणि लोकहितासाठी आवाज उठवणाऱ्या नागरिकांना मारहाण किंवा धमकी देऊन गप्प बसवता येणार नाही, असे अंनिसने म्हटले आहे. महाराष्ट्र अंनिस विद्यानंद बापट यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न असो वा अन्य कोणताही लोकहिताचा प्रश्न, मतभेद असू शकतात; पण हिंसेला कोणतेही समर्थन असू शकत नाही, असे अंनिसने ठामपणे सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *