Headlines

पुणे दहीहंडी महोत्सवात पुणेकर अनुभवणार 'दशावतार':आनंदनाथ ट्रस्ट आणि राष्ट्रप्रथम ट्रस्टतर्फे 4 व 5 सप्टेंबरला विविध सांस्कृतिक कार्यक्रम




दहीहंडी हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा उत्सव आहे. या उत्सवाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन आनंदनाथ ट्रस्ट आणि राष्ट्रप्रथम ट्रस्ट यांनी अनोखी दहीहंडी साजरी करण्याचे ठरवले आहे. ‘पुण्याच्या अभिमानाची दहीहंडी, पुण्याची सोन्याची दहीहंडी’ या संकल्पनेखाली हा उत्सव साजरा केला जाईल. या महोत्सवात पुणेकरांना कोकणातील प्रसिद्ध ‘दशावतार’ नाट्य अनुभवता येणार आहे, अशी माहिती पुणे दहीहंडी उत्सवाचे अध्यक्ष वैभव वाघ यांनी दिली. वैभव वाघ यांनी सांगितले की, दहीहंडीच्या निमित्ताने 4 आणि 5 सप्टेंबर रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील. कोकणाची 800 वर्षांची समृद्ध परंपरा असलेला ‘संयुक्त दशावतार’ या प्रयोगाने उत्सवाची सुरुवात होईल. हा प्रयोग शुक्रवारी (4 सप्टेंबर) रात्री 8.30 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. या कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री योगेश कदम, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. शनिवारी (5 सप्टेंबर) महाराणा प्रताप बागेसमोरील मधुकर चिमणराव पोतनीस रस्त्यावर मुख्य दहीहंडी उत्सव साजरा केला जाईल. सकाळी 8 वाजता सामूहिक भगवद्गीता पठणाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सुप्रसिद्ध विवेचनकार डॉ. संजयजी मालपाणी यांचे गीतेवर विवेचन असेल. दुपारी 1 ते 4 या वेळेत ‘आपकी फर्माईश’ मध्ये नागरिकांना त्यांच्या आवडीची गाणी ऐकता येतील. सायंकाळी 5 वाजता ‘ढाक्कू माकुम’ (कोकणचे बाल्या नृत्य) सादर केले जाईल. हे नृत्य पुण्यात राहणाऱ्या कोकणवासी बांधवांसाठी आणि पुणेकरांसाठी आयोजित केले आहे. सायंकाळी 5.30 वाजता उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशची ओळख असलेले सुप्रसिद्ध अहिराणी लोकनृत्य, म्हणजेच ‘बारा पावली’ नृत्य सादर केले जाईल. त्यानंतर सायंकाळी 6 वाजल्यानंतर मुख्य दहीहंडी उत्सव साजरा होईल. या उत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वैभव वाघ यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *