![]()
छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसर, गट क्रमांक ४ येथील नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. अनिल सांगवी आणि अनिल संचेती यांनी सिमेंटचे पाईप टाकून आणि कंपाऊंड बांधून हा नाला पूर्णपणे बुजवला होता. या अतिक्रमणामुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह वळवून सुमारे १२०० मिमीचे पाईप टाकून नाला एका बाजूने प्रवाहित करण्यात आला होता. या अनधिकृत बांधकामामुळे पावसाळ्यात पाणी तुंबून परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. या बांधकामाबाबत अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी सुनावणी घेतली असता, महानगरपालिकेची कोणतीही वैध परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हे सर्व अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. संबंधित व्यक्तींवर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, कारवाईसाठी लागलेला मनुष्यबळ व मशिनरीचा खर्च त्यांच्याकडून वसूल केला जाईल. या कारवाईदरम्यान नाल्यात टाकण्यात आलेले सिमेंटचे ६३ पाईप जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले. तसेच चारही बाजूचे कंपाऊंड जमीनदोस्त करून नाल्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करण्यात आला. आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार, अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहूळे, उपायुक्त सविता सोनवणे आणि सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त भारत बिऱ्हारे, सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, इमारत निरीक्षक कुणाल भोसले, इमारत निरीक्षक रवींद्र देसाई, अशोक कदम, माजी सैनिक आणि अतिक्रमण पथकातील इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, नैसर्गिक नाले, गटारे आणि सार्वजनिक जागांवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये. असे आढळून आल्यास महानगरपालिका नियमानुसार कठोर कारवाई करेल. हेही वाचा.. छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेला गती:मुख्यमंत्र्यांकडून कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना शाश्वत आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वर्षा निवासस्थानी एक संयुक्त आढावा बैठक पार पडली. महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. सविस्तर वाचा
Source link
छत्रपती संभाजीनगरमध्ये नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमण हटवले:सातारा परिसरातील गट क्रमांक 4 मधील बुजवलेला नाला मोकळा