![]()
कल्याणमधील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी चांगलेच फटकारले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात घुसून हल्ला करणाऱ्यांना जामीन मिळण्याचा कोणताही अधिकार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने संताप व्यक्त केला. म्हात्रे यांना कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत रद्द केला होता. उच्च न्यायालयाचा हा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचा आदर न करणारे लोक जामिनास पात्र नाहीत. जेव्हा एखादा जमाव रुग्णालयात घुसून कुणालाही मारहाण करतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या मानसिक आघाताची कल्पना करा, असे न्यायालयाने म्हटले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर असे हल्ले झाल्यास सामान्य लोकांच्या मदतीला कोण धावून येईल, असा सवालही न्यायालयाने विचारला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ सप्टेंबरला होणार असून, महाराष्ट्र सरकारही जामिनाविरोधात याचिका दाखल करणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी ६ जुलै रोजी शास्त्रीनगर रुग्णालयात एका गर्भवती महिलेच्या उपचारास विलंब झाल्याच्या कारणावरून महिला डॉक्टरसह इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चौफेर टीका मुंबईच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात ड्युटीवर तैनात असलेल्या एका महिला डॉक्टरसह दोन पुरुष डॉक्टरांना रमेश म्हात्रे यांनी शिवीगाळ करत मारहाण केली होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता, ज्यावरून सत्ताधारी शिवसेनेसह राज्य सरकारवर चौफेर टीका झाली होती. याप्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. म्हात्रेंनी महाराष्ट्राबाहेर राहण्याच्या अटीला दिले होते आव्हान ठाणे न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनाला १८ जुलै रोजी उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत स्थगिती दिली होती. त्यानंतर ७ ऑगस्टला उच्च न्यायालयाने म्हात्रे यांना जामीन देताना खटला सुरू होईपर्यंत महाराष्ट्राबाहेर राहण्याची अट घातली होती. यादरम्यान, त्यांना गोव्यातील कलंगुट येथे राहण्याचे आणि आठवड्यातून तीनदा अंजुना पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अटींना म्हात्रेंनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दरम्यान, सुरुवातीला अक्षय कारंडे, रमेश पवार आणि प्रमोद ऊर्फ प्रकाश निकम या तीन सह-आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. सर्व बाजूंनी वाढलेल्या दबावानंतर म्हात्रे यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास ३ वर्षांपर्यंतची कैद रुग्णालयांमध्ये डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसाचार व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) कायदा लागू आहे. त्यानुसार डॉक्टर, परिचारिका किंवा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे हा अजामीनपात्र आणि दखलपात्र गुन्हा ठरतो. यात दोषी आढळल्यास ३ वर्षांपर्यंत कैद आणि ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. याव्यतिरिक्त, रुग्णालयाच्या मालमत्तेची तोडफोड केल्यास नुकसान झालेल्या मालमत्तेच्या दुप्पट रक्कम गुन्हेगाराकडून वसूल करण्याची कडक तरतूदही या कायद्यात करण्यात आली आहे.
Source link
कल्याण रुग्णालय मारहाण:कुठल्याही डॉक्टरांवर हल्ला करणारे जामिनास पात्र नाहीत- सुप्रीम कोर्ट, शिवसेना नगरसेवक म्हात्रेंच्या जामिनाला स्थगिती कायम