![]()
नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्याची पाणीपातळी जवळपास पाच फुटांनी घटल्याने निफाड तालुक्यात पाणीसंकट निर्माण होण्याची भीती आहे. त्यातच धरणाच्या उत्तरेकडील डाव्या कालव्याच्या गेटमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याचे समोर आल्याने उपलब्ध पाण्याच्या अपव्ययाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या धरणावर अवलंबून असलेल्या जवळपास दीड लाखांहून अधिक नागरिकांच्या पाणीपुरवठ्याचा विचार करता पाटबंधारे विभागाने तातडीने गळती रोखून पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. गोदावरी, दारणा आणि कादवा या तीन नद्यांच्या संगमावर नांदूरमध्यमेश्वर धरण आहे. या धरणातील पाण्यावर निफाड तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. सध्या धरणाची पाणीपातळी जवळपास पाच फुटांनी घटल्याने संबंधित गावांतील पाणीपुरवठ्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. धरणातील पाणीसाठा आणखी कमी झाला आणि पुढील पाण्याचे आवर्तन मिळण्यास विलंब झाला, तर या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे आव्हान स्थानिक यंत्रणांसमोर उभे राहण्याची चिन्हे आहेत. एकीकडे धरणाची पाणीपातळी घटत असताना दुसरीकडे धरणाच्या उत्तरेकडील डाव्या कालव्याच्या गेटमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. कालव्यात येणारे पाणी ओव्हरफ्लो पाईपद्वारे नदीपात्राच्या दिशेने सोडले जात असल्याने उपलब्ध पाण्याचा अपव्यय होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. या पाण्याचा नदीकाठच्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा होत असला, तरी पाणीटंचाईची शक्यता असताना अशा प्रकारे पाणी वाहून जाणे योग्य नसल्याची भूमिका पाणीपुरवठा समित्यांकडून मांडली जात आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि त्यावर अवलंबून असलेल्या गावांची संख्या लक्षात घेता प्रत्येक थेंबाचे नियोजन करणे आवश्यक असल्याचेही सांगितले जात आहे. धरणाच्या पाणीपातळीत झालेली घट आणि डाव्या कालव्याच्या गेटमधून होणारी गळती या दोन्ही बाबींचा विचार करून पाटबंधारे विभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी, गळतीचे कारण शोधून ती थांबवावी आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी पाणीपुरवठा समित्यांकडून होत आहे. धरणातील पाणीसाठा कमी होत असताना कालव्यातून होणारी गळती रोखणे आणि पाणीपुरवठा योजनांसाठी उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. लासलगावसह १६ गावांची पाणीपुरवठा योजना, पिंपरीसह १२ गावांची योजना, निमगावसह १३ गावांची योजना, तसेच गोदाकाठ परिसरातील चांदोरी, सायखेडा, करंजगाव आणि शिंगवे या भागांतील पाणीपुरवठा योजनांसाठी याच धरणातील पाण्याचा वापर केला जातो. या योजनांच्या माध्यमातून जवळपास दीड लाखांहून अधिक नागरिकांची तहान भागवली जाते.
Source link
नांदूरमध्यमेश्वर धरणातून गळती; पाणीपातळी पाच फुटांनी घटली:दीड लाख नागरिकांच्या पुरवठ्याची चिंता; गळती रोखण्याची मागणी