Headlines

नातेवाइकाशी बोलल्याचा राग:घटस्फोटित पतीने घरात घुसून माजी पत्नीचे कापले केस, संभाजीनगरच्या हर्सूल परिसरातील थरारक घटना




एका नातेवाइकाशी सार्वजनिक ठिकाणी बोलल्याचा राग मनात धरून, घटस्फोटित पतीने आपल्या कुटुंबीयांसह माजी पत्नीच्या घरात मध्यरात्री घुसून तिला मारहाण केल्याची घटना हर्सूल परिसरात घडली. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी तिचे केस कापून तिचे टक्कल केले. याप्रकरणी घटस्फोटित पतीसह चार जणांवर हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला आपल्या बहिणीसोबत खुलताबाद येथील दर्ग्यात दर्शनासाठी गेली होती. योगायोगाने तेथे तिची भेट तिच्या नणंदेच्या पतीशी (मेहुण्याशी) झाली. ते एकमेकांशी सहज बोलत असताना महिलेच्या घटस्फोटित पतीने त्यांना पाहिले. ‘माझ्या माजी पत्नीने माझ्याच नातेवाइकाशी का बोलावे?’ याचा राग त्याच्या डोक्यात गेला. शनिवारी (१२ सप्टेंबर) मध्यरात्री दोनच्या सुमारास आरोपी पतीने आपला भाऊ, बहीण आणि आणखी एका नातेवाइकाला सोबत घेऊन पीडितेचे हर्सूल परिसरातील घर गाठले. घरात घुसताच त्यांनी पीडित महिला आणि तिच्या बहिणीला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. नणंदेने पीडितेला घट्ट पकडून ठेवले, तर संतापलेल्या पतीने तिचे केस निर्दयीपणे कापून तिला टक्कल केले. त्यानंतर नणंदेने कमरेच्या बेल्टने महिलेच्या डोक्यावर वार करून तिला रक्तबंबाळ केले. या भयंकर प्रकारानंतर दहशतीखाली असलेल्या पीडित महिलेने सोमवारी (१४ सप्टेंबर) हर्सूल पोलिस ठाणे गाठून आपबीती सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटस्फोटित पती आणि त्याच्या ३ नातेवाइकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *