![]()
नाचनवेल कन्नड तालुक्यातील नादरपूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा शुक्रवारी (दि. ६ नोव्हेंबर) ज्येष्ठ नागरिक कक्षात ग्रामसभा अध्यक्ष गणेश प्रभाकर निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेचा कोरम पूर्ण झाल्यानंतर विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून महत्त्वपूर्ण ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आले. गावातील भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभेत पाणीप्रश्नावर विशेष भर देण्यात आला. ‘जलजीवन मिशन’अंतर्गत गावातील पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले आहे; परंतु ट्रान्सफॉर्मरअभावी पाणीपुरवठा अद्याप सुरू होऊ शकलेला नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसांत ट्रान्सफॉर्मर बसवून पाणीपुरवठा सुरू न केल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा ठाम निर्धार ग्रामसभेत व्यक्त करण्यात आला. पाणीटंचाईच्या काळात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावात उपस्थित राहून जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, हलगर्जीपणा आढळल्यास कडक कारवाई करण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच पिशोर येथील पाणीपुरवठा विहिरीवरील मोटार सुरू-बंद करण्यासाठी मानधनावर एका व्यक्तीची नियुक्ती करण्यावर चर्चा झाली. शासकीय योजनांची पोर्टलवर सादर न केल्यास व गाव बक्षीस योजनेपासून वंचित राहिल्यास संबंधितांवर कारवाईचा निर्णय घेण्यात आला. नादरपूर येथे ग्रामसभा पार पडली.
Source link
नादरपूर येथे येत्या आठ दिवसांत ट्रान्सफॉर्मर न बसवल्यास उपोषण