![]()
देशातील वैद्यकीय विद्यार्थ्यांची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (FEMA) ने नीट-युजी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार आणि परीक्षा प्रशासनाकडे पाच महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. यामध्ये उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा केंद्रात प्रवेश देण्याची मागणी सर्वाधिक चर्चेत आहे. दरवर्षी नीट परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना दूरच्या परीक्षा केंद्रांमुळे प्रवास, वेळेवर पोहोचण्याची धावपळ, उष्णतेचा सामना आणि मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांना अधिक सुलभ आणि तणावरहित वातावरण मिळावे, यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत, असे फेमाने म्हटले आहे. संघटनेने केलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या शहरांमध्ये किंवा जवळच्या भागात परीक्षा केंद्र मिळावे, अशी मागणी केली आहे. यामुळे पालकांवरील प्रवास आणि निवासाचा अतिरिक्त आर्थिक भार कमी होईल, असा दावा संघटनेने केला आहे. तसेच, सरकारने भविष्यात नीट परीक्षा पद्धतीत कोणताही बदल करण्याचा निर्णय घेतल्यास, त्याची माहिती विद्यार्थ्यांना खूप आधी देण्यात यावी, जेणेकरून तयारीमध्ये गोंधळ निर्माण होणार नाही. फेमाची सर्वाधिक चर्चेत आलेली मागणी म्हणजे १० ते २० मिनिटे उशिरा पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्याची. वाहतूक कोंडी, तांत्रिक अडचणी किंवा अनपेक्षित कारणांमुळे काही विद्यार्थी वेळेत पोहोचू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना सरसकट बाहेर ठेवणे अन्यायकारक असल्याचे संघटनेचे मत आहे. देशातील अनेक भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट सुरू असल्याने परीक्षा केंद्रांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा काळात कोणताही शारीरिक त्रास होऊ नये, यावर संघटनेने भर दिला आहे. दरम्यान, नीट-युजी २०२६ संदर्भातील या मागण्यांवर केंद्र सरकार किंवा परीक्षा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
Source link
नीट-युजीसाठी फेमा विद्यार्थ्यांच्या बाजूने मैदानात:उशिरा येणाऱ्यांना प्रवेश द्या, परीक्षा केंद्र व सुविधांबाबत केंद्र सरकारकडे मागण्या