![]()
न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर संशयित आरोपींना सातारा जिल्हा कारागृहात घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनला अचानक आग लागल्याची घटना कराड शहरात घडली. शहरातील गजबजलेल्या भेदा चौकात शनिवारी रात्री सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच व्हॅनमधून धुराचे मोठे लोट बाहेर पडू लागले आणि आगीने रौद्ररूप धारण केले. मात्र, व्हॅनमधील पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्वांना सुरक्षित बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी पोलीस व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील रेठरे येथे झालेल्या मारामारीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या आरोपींना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी कराड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांना पोलीस व्हॅनमधून सातारा जिल्हा कारागृहात हलविण्यात येत होते. यासाठी पोलीस कर्मचारी आरोपींसह कराडहून साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, ही पोलीस व्हॅन कराड शहरातील भेदा चौक परिसरात पोहोचली असताना अचानक वाहनातून धूर येऊ लागला. काही वेळातच धुराचे प्रमाण वाढले आणि व्हॅनला आग लागल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. भर चौकात अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वाहनचालक आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली. व्हॅनमधून आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली. पोलीस अंमलदारांचे प्रसंगावधान; सर्वांना सुरक्षित बाहेर काढले व्हॅनला आग लागल्याचे लक्षात येताच पोलीस अंमलदार शहाजी चव्हाण यांनी प्रसंगावधान राखले. त्यांनी तातडीने व्हॅन मोकळ्या जागेत उभी केली. त्यानंतर वाहनातील पोलीस कर्मचारी आणि न्यायालयीन कोठडीतील सर्व संशयित आरोपींना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. वाहनातून सर्वजण बाहेर पडल्यानंतर काही वेळातच आगीने मोठे स्वरूप धारण केले. त्यामुळे काही क्षणांतच संपूर्ण पोलीस व्हॅन आगीच्या विळख्यात सापडली. घटनेची माहिती मिळताच कराड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला आणि आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, तोपर्यंत आगीने वाहनाचे मोठे नुकसान झाले होते. व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणताही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा आरोपी जखमी झाला नाही. जुन्या शासकीय वाहनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर कराडमधील या घटनेनंतर पोलीस दलासह विविध शासकीय विभागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या जुन्या वाहनांच्या देखभाल आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. अनेक शासकीय विभागांमधील जुनी वाहने वारंवार बंद पडणे, स्टार्टरमध्ये बिघाड होणे, वायरिंगच्या समस्या निर्माण होणे अशा अडचणींचा सामना करत असल्याचे चित्र आहे. काही वाहनांना रस्त्यातच धक्का मारून सुरू करण्याची वेळही येत असल्याचे यापूर्वी समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून महसूल, पोलीस, कृषी आणि वन विभागांसाठी नवीन वाहनांची खरेदी करण्यात आली होती. मात्र, काही विभागांमध्ये अद्यापही जुनी वाहने वापरली जात असल्याचे दिसून येते. वाहनांच्या जुन्या वायरिंगमुळे शॉर्टसर्किट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कराडमधील पोलीस व्हॅनला लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी या घटनेमुळे शासकीय वाहनांची नियमित तपासणी, देखभाल आणि कालबाह्य वाहने बदलण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. एका बाजूला न्यायालयीन कोठडीतील आरोपींना कारागृहात नेण्याची जबाबदारी पार पाडली जात असताना दुसरीकडे भर चौकात पोलीस वाहनाने अचानक पेट घेतल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र, पोलीस अंमलदार शहाजी चव्हाण यांच्या समयसूचकतेमुळे सर्वांचे प्राण वाचले. या घटनेने जुन्या शासकीय वाहनांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हेही वाचा… पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं:पत्नीच्या छळाचा कुटुंबीयांचा आरोप, जुलैतील तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचा दावा पालघर जिल्ह्यातून पोलीस दलालाच हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. पालघर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी संतोष झिंजुर्डे यांनी जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलीस विभागात शोककळा पसरली असून, त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सुरुवातीला ही घटना आत्महत्येची असल्याचे समोर आले असले, तरी त्यांच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी गंभीर संशय व्यक्त केला आहे. पत्नीच्या कथित मानसिक छळाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सविस्तर वाचा…
Source link
न्यायालयीन कोठडीतील आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनला भर चौकात आग:पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली