![]()
पुण्यातील पेठ बुधवारच्या ऐतिहासिक भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सुमारे ३५ कोटी रुपये खर्चाच्या या स्मारकात ऑडिओ-व्हिडिओ शो, होलोग्राफी आणि माहितीपटांमधून सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे जीवनकार्य उलगडले जाणार आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी, १४ तारखेला कामाची पाहणी केली. स्मारकासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. दृश्यश्राव्य यंत्रणा आणि होलोग्राफीच्या कामासाठी तज्ज्ञ समिती नेमण्यात आली आहे. पाहणीवेळी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता (भवन विभाग) बिपिन शिंदे आणि उपायुक्त अविनाश संकपाळ उपस्थित होते. संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते. स्मारकासाठी २७२.५७ चौरस मीटर जागा उपलब्ध आहे. एकूण १,११४.५५ चौरस मीटर बांधकाम क्षेत्र प्रस्तावित आहे. आरसीसी, स्टील स्ट्रक्चर, वीटकाम आणि आतील-बाहेरील प्लास्टरची कामे पूर्ण झाली आहेत. फॉल्स सिलिंगचे फ्रेमिंग आणि अग्निशमन यंत्रणेचे कामही पूर्ण झाले आहे. सध्या विद्युत कामांसह ऑडिओ-व्हिडिओ शो आणि होलोग्राफी यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे. स्मारकाच्या घुमटांमध्ये फुले दाम्पत्याच्या जीवनावर आधारित ऑडिओ-व्हिडिओ शो दाखवला जाणार आहे. होलोग्राफीच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि शैक्षणिक क्रांतीचा इतिहास दाखवला जाईल. माहितीपट आणि इतर दृश्यश्राव्य माध्यमांतून त्यांच्या जीवनातील प्रसंगांची माहिती अभ्यागतांना मिळेल. स्मारकात महिला आणि मुलींसाठी कौशल्य विकास केंद्र, ग्रंथालय, मार्गदर्शन केंद्र, संगणक केंद्र आणि ॲम्फीथिएटर उभारले जाणार आहे. येथे शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमही घेता येतील.
Source link
भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात:35 कोटींच्या प्रकल्पाची मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली