Headlines

पंढरपुरात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली दुष्काळाविरोधात आक्रोश मोर्चा:26 सप्टेंबरला आंदोलन, सरकारकडे मोठी मागणी




राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाअभावी शेती संकटात आली असून, उभी पिके करपण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन, कापूस, बाजरी, मका तसेच कडधान्यांच्या पिकांवर परिणाम झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. पंढरपुरात 26 सप्टेंबर रोजी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी पंढरपुरात पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीनंतर माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोर्चाबाबत माहिती दिली. सरकारला जाग आणण्यासाठी मोर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा मुद्दा चर्चेत आहे. शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी अडचणीत आली असून, ग्रामीण भागात पाणी आणि चाऱ्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शरद पवार यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माहितीनुसार, सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्याबाबत पुरेशी कार्यवाही होत नसल्याने हा मोर्चा काढण्यात येत आहे. “सरकारला जाग येत नाही म्हणून आम्ही हा मोर्चा काढणार”, अशी भूमिका त्यांनी मांडली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात होणार असून, तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकरी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील नेते सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या मोर्चासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांच्या सहभागाचे नियोजन करण्यात येत असल्याचे मोहिते पाटील यांनी सांगितले. मोर्चापूर्वी विठ्ठलाला साकडे या आंदोलनाला धार्मिक-सामाजिक संदर्भही जोडण्यात आला आहे. मोर्चापूर्वी शरद पवार गटाचे आमदार, खासदार आणि शेतकरी विठ्ठल मंदिरात जाऊन सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव व्हावी आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळावी, यासाठी विठ्ठलाला साकडे घालणार आहेत. यानंतर मोर्चाच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी प्रशासनासमोर मांडली जाणार आहे. बैठकीला काही आमदारांची अनुपस्थिती दरम्यान, दुष्काळ मोर्चाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीला पक्षातील काही आमदार उपस्थित नसल्याचेही समोर आले. आमदार उत्तम जानकर आणि आमदार नारायण पाटील हे बैठकीला अनुपस्थित होते, अशी माहिती देण्यात आली. त्यांच्या अनुपस्थितीची कारणे मात्र स्पष्ट झालेली नाहीत. शरद पवारांकडूनही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी दरम्यान, शरद पवार यांनी 18 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजार रुपये मदत, शेतमजूर कुटुंबांना मदत, कर्जमाफी, नवीन पीककर्ज आणि पीकविमा संरक्षणासह विविध उपाययोजनांची मागणी त्यांनी केली आहे. तसेच, शरद पवार 28 सप्टेंबरपासून दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे वृत्त आहे. पंढरपुरातील 26 सप्टेंबरच्या मोर्चातून दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार असून, शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि दुष्काळी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येणार आहे. हेही वाचा… शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही!:आजपासूनच सर्कलनिहाय पंचनामे; संजय राऊत डोक्यावर पडल्यासारखे वागतात- गिरीश महाजनांचा पलटवार “राज्यात पावसाने 30 ते 35 दिवसांचा खंड दिल्याने खरीप पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. केंद्र सरकारच्या निकषांची किंवा 5 ऑक्टोबरच्या नियमांची वाट न पाहता राज्य शासनाने आजपासूनच सर्कलनिहाय प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे सुरू केले आहेत. कोणाचे किती नुकसान झाले हे तपासून बळीराजाला तत्काळ थेट आर्थिक मदत दिली जाईल. दुष्काळाच्या सावटाखाली शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ दिली जाणार नाही,” अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *