.

आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर नगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी अभियान वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. पथकाने बुधवारी रात्री १० वाजता जेसीबीच्या सहाय्याने बंद दुकाने, खोक्यांची जाणीवपूर्वक नासधूस केल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाच्या या मनमानी विरोधात जनतेसोबतच नगराध्यक्ष भालके यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिका-यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या आक्रमक पावित्र्याने व व्यावसायिकांनी अतिक्रमण पथकाला घेराव घातल्याने अधिकाऱ्यांची पळता भुई थोडी झाली होती.
आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर शहरात नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू केली आहे, परंतु ही कारवाई करताना सकाळी नोटीस देऊन रात्री १० वाजता दुकाने, खोकी बंद असताना जेसीबीने तोडून टाकल्याचे समोर आले. यामुळे संतप्त नागरिकांनी पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला घेराव घातला. अतिक्रमणे काढताना नुकसान करण्याचा प्रकार चुकीचा असल्याने नगराध्यक्ष, विरोधी पक्षाचे उपनगराध्यक्ष, पालिकेतील गटनेते, दोन्ही ही आघाड्यांच्या नगरसेवकांनी पालिका प्रशासनाची कानउघाडणी केली. नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई देण्याचीही मागणी केली आहे. ^शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमण हटवण्यासाठी १५ दिवसांपूर्वी नोटिसा दिलेल्या आहेत. स्पीकरवरून घोषणा करण्यात आलेली आहे, अतिक्रमणावर नोटिसा चिकटवल्या आहेत. त्यानंतर पोलिस बंदोबस्त घेऊन अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. आणि ही कारवाई सकाळी १० वाजल्या नंतर सायंकाळी साडे सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान करण्यात आलेली आहे. महेश रोकडे, मुख्याधिकारी, पंढरपूर
^आषाढी यात्रेनिमित्त अतिक्रमण काढण्याचे काम सुरू असले तरी ती काढताना पालिका प्रशासनाने काळजी घ्यायला हवी होती, नोटीस पिरियड पुरेसा द्यायला हवा होता. अतिक्रमण नागरिक काढून घेत असताना जेसीबीच्या मदतीने नुकसान करणे चुकीचे आहे. आम्हा नगरसेवकांना विश्वासात न घेता ही कारवाई केली जात आहे. – महादेव धोत्रे, उपनगराध्यक्ष
पोलिस बंदोबस्तात स्टेशन रोड सह टिळक स्मारक मंदिराच्या मार्गावरील चप्पल आणि इतर दुकानांच्या पायऱ्या आणि ऊन, पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून केलेली रस्त्यावरील त्यांची अतिक्रमणे काढून टाकली. तसेच स्टेशन रोडवरील सुरवसे बिल्डिंग, शिरूरकर महाराज मठ आणि कन्या प्रशालेकडे जाणाऱ्या मार्गावरील काही खोकी रात्री १० वाजता जेसीबीने तोडून टाकली आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात इतर साहित्याचे नुकसान झाले आहे.
^पालिका प्रशासनाने अतिक्रमण काढताना नोटिसा दिल्या, परंतु अतिक्रमण धारकांना ती काढून घेण्यासाठी पुरेसा वेळ दिल्याचे दिसत नाही. अतिक्रमण काढताना काळजी घेणे अपेक्षित होते, मात्र जाणून-बुजून काही लोकांचे नुकसान केल्याचे दिसून येते. हे पूर्णतः चुकीचे असून भविष्यात असा प्रकार दिसून आला तर संबंधितांवर कारवाई करू. – प्रणिता भालके, नगराध्यक्ष, पंढरपूर