Headlines

पबमध्ये महिलेसोबत आढळल्याने पोलिस हवालदार निलंबित:कोम्बिंग ड्युटीचे खोटे सांगून पत्नीचा छळ केल्याप्रकरणी कारवाई




कोम्बिंग ऑपरेशन ड्युटीवर असल्याचे खोटे सांगून पबमध्ये एका महिलेसोबत आढळल्याने एका पोलिस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे. पत्नीचा छळ केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्या पोलिस हवालदाराचे नाव हनुमंत गुलाब कांबळे (रा. पीर वस्ती, वडकी) असे आहे. पोलिस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. कांबळे यांच्या पत्नीने त्यांच्याविरुद्ध काळे पडळ पोलिस ठाण्यात कौटुंबिक छळाची फिर्याद दिली आहे. कांबळे याच्या वर्तनामुळे शिस्तबद्ध पोलिस खात्याची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत त्याला पोलिस दलातून निलंबित करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध आणि संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिस हवालदार हनुमंत कांबळे याने एका महिलेसोबत अनैतिक संबंध लपवून ठेवले. पतीने पोलिस असल्याची आणि वर्दीचा धाक दाखवून वेळोवेळी शिवीगाळ केली, मारहाण केली. तसेच घरातून हाकलून देण्याबरोबरच घटस्फोट देण्याची धमकी देऊन शारीरिक व मानसिक छळ केला. आरोपी महिलेनेही फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. १५ जून २०२६ रोजी फिर्यादीने पती कांबळे याला रात्री फोन केला असता, त्याने कोम्बिंग ड्युटीवर असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात तो पिंपरी चिंचवड येथील ‘सी डॉक’ या पबमध्ये त्या महिलेसोबत दारू पीत बसला होता. पत्नीने तेथे जाऊन जाब विचारल्यावर, “मी पोलिस आहे, माझे काही होणार नाही, तू काही करू शकत नाहीस,” असे तो बोलला. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर फिर्यादीने पोलिस ठाण्यात धाव घेत पती आणि संबंधित महिलेविरुद्ध तक्रार दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *