Headlines

परभणी जिल्हा बँकेवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा!:14 वर्षांनंतर रामप्रसाद बोर्डीकर अध्यक्षपदी, तर राजेश पाटील उपाध्यक्ष




परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अत्यंत नाट्यमय घडामोडींनंतर भाजपचे खंदे नेते तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची अध्यक्षपदी, तर हिंगोलीचे राजेश पाटील गोरेगावकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. तब्बल १४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बोर्डीकर यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पुनरागमन केले असून, या निवडीमुळे परभणी जिल्हा बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने आपले पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले आहे. परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांत कार्यक्षेत्र असलेल्या २१ संचालकांच्या या बँकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे नेते जोरदार मोर्चेबांधणी करत असतात. २०१२ मध्ये बँकेच्या कर्मचारी आणि सभासदांच्या विमा घोटाळ्याप्रकरणी बोर्डीकर यांना अध्यक्षपद सोडावे लागले होते. मात्र, तब्बल १४ वर्षांनंतर त्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण राजकीय गणिते फिरवत बँकेच्या अध्यक्षपदावर आपले नाव कोरले आहे. नाट्यमय घडामोडी अन् बहुमताचे गणित फिरले यंदाच्या जिल्हा बँक निवडणुकीत जिल्ह्यातील दोन परस्परविरोधी राजकीय धुरंधर नेते रामप्रसाद बोर्डीकर आणि सुरेश वरपुडकर यांनी एकत्र येत ‘सहकार पॅनल’ उभे केले होते. या पॅनलने २१ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय मिळवून बँकेवर वर्चस्व मिळवले, तर शिवसेना (शिंदे गट) ३ जागांवर विजयी झाली. वरपुडकर-बोर्डीकर आमनेसामने, बोर्डीकरांचे थेट आव्हान निकालांनंतर अध्यक्षपदावरून बोर्डीकर आणि वरपुडकर यांचे गट आमनेसामने आले. वरपुडकर गटाला शिंदे सेनेचा पाठिंबा असल्याने संख्याबळाच्या दृष्टीने वरपुडकर गट आघाडीवर मानला जात होता. मात्र, ऐनवेळी रामप्रसाद बोर्डीकर यांनी आपल्या राजकीय अनुभवाच्या जोरावर बहुतांश संचालकांचे पाठबळ आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले. उपाध्यक्षपदाचा तिढा उपाध्यक्ष पदासाठी शिंदे सेनेचे आमदार सईद खान यांनीही दावा ठोकत अर्ज दाखल केला होता आणि वरिष्ठ पातळीवरून तसा निरोपही आला होता. मात्र, बोर्डीकर गटाच्या संचालकांनी राजेश पाटील गोरेगावकर यांच्या बाजूने ठाम कौल दिला. अखेर वरिष्ठ पातळीवरील वाटाघाटींनंतर दोन्ही प्रमुख पदांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. माझ्या वडिलांना खोट्या प्रकरणात अडकवले होते – मेघना बोर्डीकर या ऐतिहासिक निवडीनंतर रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. “१४ वर्षांपूर्वी माझ्या वडिलांना एका खोट्या प्रकरणात अडकवून अध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आले होते. परंतु, आज पुन्हा एकदा सर्व संचालकांनी आणि सभासदांनी त्यांच्यावर दाखवलेला हा विश्वासच सत्य काय आहे हे सिद्ध करतो,” असे त्या म्हणाल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *