Headlines

हरवलेल्या तीन वर्षीय चिमुकलीचा अवघ्या तासाभरात शोध:वारजे पोलिसांच्या तत्परतेमुळे पालकांना दिलासा, शोधमोहिमेत 30 पोलिसांचा सहभाग




वारजे पोलिसांनी हरवलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा अवघ्या एका तासात शोध घेऊन तिला सुखरूप तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले. प्राजु अमोल पवार असे या मुलीचे नाव आहे. प्राजु सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वारजे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडारवस्ती येथे इतर मुलांसोबत खेळत होती. खेळता-खेळता ती अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी परिसरात तिचा शोध घेतला, मात्र ती कुठेही आढळून आली नाही. त्यानंतर तिची आई सुषमा अमोल पवार यांनी दुपारी एक वाजता वारजे पोलिस ठाण्यात माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, तात्काळ पोलिस उपायुक्त सागर कवडे आणि सहायक पोलिस आयुक्त सुजाता तानवडे यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर वारजे पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदारांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. पोलिसांनी वडारवाडी, कर्वेनगर आणि आजूबाजूचा परिसर पायी पिंजून काढला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तसेच गुप्त बातमीदारांकडून माहिती गोळा करण्यात आली. नागरिक आणि पोलिस मित्रांच्या व्हॉट्सॲप समूहांवरही मुलीची माहिती प्रसारित करण्यात आली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास, बिजली तालीम चौक, कर्वेनगर येथे ती मुलगी एका महिलेजवळ सुखरूप आढळून आली. शिलादेवी कुमार सोनकर नावाच्या महिलेला ही मुलगी एकटीच रस्ता ओलांडताना दिसली होती. त्यामुळे त्यांनी तिला सुरक्षितपणे स्वतःजवळ थांबवून ठेवले होते. मुलगी आपले नाव आणि पत्ता सांगू शकत नव्हती. पाऊस कमी झाल्यानंतर तिला पोलिस चौकीत नेण्याचा सोनकर यांचा विचार होता. या शोधमोहिमेत तीन पोलिस निरीक्षक, पाच पोलिस उपनिरीक्षक आणि ३० अंमलदार सहभागी झाले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बाळकोटगी यांनी दिली. चिमुकली सुखरूप मिळाल्याने तिच्या आई-वडिलांनी वारजे पोलिसांचे आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *