Headlines

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक:जागा शिंदेसेनेची, पण राष्ट्रवादीच्या आमदार राजेश नवघरेंकडून थेट विजयाची घोषणा!




परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीची जागा शिंदेसेनेकडे असून यावेळी नवीन चेहऱ्याला संधी मिळणार असल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही या जागेवर आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी अन शिंदेसेनेत रस्सीखेच सुरु झाली आहे. परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी सुमारे 435 मतदार आहेत. मागील वेळी या निवडणुकीत बाहेरून आयात केलेले उमेदवार विप्लव बाजोरीया यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र बाजोरीया यांनी अर्थकारण दाखवत आपला विजय पदरात पाडून घेतला होता. एकदा विजय मिळविल्यानंतर बाजोरीया यांना हिंगोली-परभणीकडे पाठ फिरवली. त्यांचा कारभार त्यांचे नातेवाईकच पाहू लागले होते. त्यांच्या कार्यकाळात या भागात ‘मामा’ चाच हस्तक्षेप वाढला होता. बाजोरीया यांच्याकडे पोहोचण्यासाठी मामाला सलामी द्यावी लागत होती. त्यावरून लोकप्रतिनिधी व नागरीकांमधूनही तीव्र असंतोष निर्माण झाला होता. दरम्यान, आता यावेळी निवडणुका जाहीर होताच बाजोरीया पिता पुत्रांनी पुन्हा एकदा हिंगोली-परभणीसाठी चाचपणी सुरु केली आहे. त्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही भेट घेऊन संवाद साधला आहे. या शिवाय त्यांनी हिंगोलीच्या मतदारांशी संवाद साधून त्यांना ‘आश्‍वासन’ दिले आहे. आमचाच उमेदवार विजयी होणार- आमदार नवघरे दरम्यान, हिंगोली-परभणी जिल्ह्यातील या जागेवर राष्ट्रवादीने आपला हक्क सांगण्यास सुरवात केली असून त्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार राजेश नवघरे यांनी आमचाच उमेदवार विजयी होणार अशी घोषणाही करून टाकली. तर दुसरीकडे सदर जागा शिंदेसेनेची असल्यामुळे यावेळी शिंदेसेनेकडून युवा जिल्हा प्रमुख राम कदम यांचे नांव चर्चेत आहे. त्यामुळे शिंदेसेनेकडून बाजोरीया की कदम यापैकी एकाला उमेदवारी मिळणार आहे. या निवडणुकीत भाजपाकडून मात्र कुठल्याही प्रकारच्या हालचाली सुरु झालेल्या दिसत नाहीत. भाजपाकडून इच्छूक उमेदवार असले तरी या ठिकाणची जागा भाजपला नसल्यामुळे इच्छूक उमेदवार चर्चेत राहण्यासाठी आपल्या नावाचे घोडे दामटत असल्याचे चित्र आहे. ऐनवेळी राजकीय पटलावर काय भूमिका घेतली जाणार याकडे मतदारांची लक्ष लागले आहे. ..तर मामाला पुन्हा येणार अच्छे दिन माजी आमदार विप्लव बाजोरीया यांच्या निवडीनंतर ‘मामा’च्या सांगण्यावरूनच सर्व कारभार सुरु होता. त्यामुळे प्रशासनातही निधी वाटपात मामा चाच हस्तक्षेप वाढला होता. भुसारच्या दुकानातून मामा थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीसमोर जाऊन बसू लागले होते. आता पुन्हा एकदा बाजोरीया यांना उमेदवारी मिळाल्यास मामाला अच्छे दिन येणार असल्याचे बोलले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *