Headlines

पहिल्या टप्प्यात 37.52 लाख गोटपॉक्स लसमात्रांचे वाटप सुरू:पशुसंवर्धन आयुक्तांचे लसीकरण मोहीम गतिमान करण्याचे आवाहन




राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी २०२६-२७ वर्षासाठी आवश्यक गोटपॉक्स लसमात्रांचे उत्पादन सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात ३७ लाख ५२ हजार लसमात्रांचे जिल्हानिहाय वाटप सुरू करण्यात आले आहे. पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. या लसमात्रांचे उत्पादन पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे येथे करण्यात आले आहे. लसींची शीत साखळी अबाधित ठेवून त्या वेळेत क्षेत्रीय स्तरावर पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अधिक दूध देणाऱ्या व उच्च उत्पादनक्षम पशुधनाचे प्राधान्याने लसीकरण करण्याचे निर्देश आहेत. तसेच, लसीकरणाचा दैनंदिन अहवाल नियमित सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. गतवर्षी ज्या तालुक्यांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव अधिक होता, त्या हॉटस्पॉट भागांमध्ये प्राधान्याने लसीकरण मोहीम राबवली जाईल. या मोहिमेसाठी सहकारी दुग्ध संघ, स्वयंसेवी संस्था, खाजगी पशुवैद्यक आणि सेवादाते यांच्या सक्रिय सहभागाचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. लम्पी चर्मरोगासारख्या संसर्गजन्य आजारांपासून राज्यातील पशुधनाचे संरक्षण करणे हे पशुसंवर्धन विभागाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. पशुधन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असल्याने त्यांचे आरोग्य राखणे आवश्यक आहे. गोटपॉक्स लसीकरण हा या रोगावरील प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. पशुपालकांनी या मोहिमेत विभागास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *