Headlines

पहिल्या मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला धक्का; मृत संगीता चांदगुडेंच्या बहिणीचा दावा:जमिनीच्या वाटणीवरून भाऊजींनीच घरच्यांशी 20 वर्षे ठेवला दुरावा




खवड्या डोंगरावर चांदगुडे कुटुंबातील तिघांनी दरीत उडी घेऊन जीवन संपवल्याच्या घटनेत आता एक नवीन बाजू समोर आली आहे. मृत संगीता चांदगुडे यांनीच पती मुरलीधर यांना त्यांच्या आई-वडिलांपासून दूर केले, असा आरोप होत असताना संगीता यांची बहीण पल्लवी यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. ‘दिव्य मराठी’ शी संवाद साधताना पल्लवी यांनी या कुटुंबाचा गेल्या 23 वर्षांचा संघर्ष, पहिल्या मुलाचा मृत्यू आणि जमिनीच्या वाटणीवरून झालेला खरा वाद उघड केला आहे. पुण्यामध्ये व्यवसाय करणाऱ्या पल्लवी यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. गावाने पंचायत बसवून दिली होती शेतात जागा : 23 वर्षांपूर्वी जेव्हा यांचे लग्न झाले तेव्हा संगीता शहरातील असल्याने ती खेड्यात राहू शकणार नाही या कारणावरून सासरच्यांचा लग्नाला विरोध होता. जेव्हा मोठा मुलगा आदित्य 14-15 महिन्यांचा होता तेव्हा हे दांपत्य गावी गेले असता घरच्यांनी त्यांना घरात घेतले नाही. त्या वेळी गावात पंचायत बसली आणि त्यांनी मुरलीधर यांच्या नावावर असलेल्या शेतात त्यांना राहायला जागा दिली. मुरलीधर ड्रायव्हर म्हणून काम करत असताना संगीता यांनी मुलांना पाठीला बांधून सलग 4 वर्षे एकटीने शेती केली, अशी माहिती पल्लवी यांनी दिली. पती व मुलाला वाचवण्यासाठी तिने सेकंदात उडी घेतली संगीता चांदगुडे यांच्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या माहितीवर खंत व्यक्त करताना पल्लवी म्हणाल्या की, जर संगीताला 20 वर्षे नवऱ्याचा एवढाच त्रास असता तर तिने काही सेकंदांचाही विचार न करता नवऱ्याच्या आणि मुलाच्या मागोमाग दरीत उडी घेतली नसती. घाटी रुग्णालयात मृतदेह ताब्यात घेताना मुरलीधर यांच्या नातेवाइकांनी कुणाल आणि संगीता यांच्या मृत्यूवर अजिबात दुःख व्यक्त केले नाही, केवळ मुरलीधर यांच्यासाठीच ते हळहळले, ही बाब अत्यंत वेदनादायी असल्याचे पल्लवी यांनी सांगितले. ..म्हणून कुणालच्या मनात वडिलांबाबत असुरक्षितता गेल्या 10 वर्षांत मुरलीधर यांना कमरेचा गंभीर आजार झाला असतानाही त्यांच्या घरचे कोणीही त्यांना भेटायला आले नव्हते. 4 महिन्यांपूर्वी एका लग्नाच्या निमित्ताने मुरलीधर गावी गेले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्या एका भाच्याने आत्महत्या केल्याने ते महिनाभर तिथेच थांबले. ज्या नातेवाइकांनी 20 वर्षे विचारपूस केली नाही त्यांच्याकडे वडील अचानक राहायला लागल्याने 18 वर्षांचा कुणाल दुरावला गेला आणि त्याच्या मनात वडिलांबद्दल असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असावी, अशी शक्यता पल्लवी यांनी व्यक्त केली. 14 वर्षांपूर्वी पहिल्या मुलाचा मृत्यू आणि जमिनीचा वाद संगीता आणि मुरलीधर यांना आदित्य नावाचा पहिला मुलगा होता, ज्याचा 14 वर्षांपूर्वी मृत्यू झाला. या घटनेचा संगीता यांना इतका मोठा धक्का बसला होता की, त्या मानसिकदृष्ट्या अस्थिर झाल्या होत्या आणि रात्री-अपरात्री मुलाच्या शोधात शेतात जात असत. या दुःखातून सावरण्यासाठी संगीता आणि मुरलीधर 15 दिवसांसाठी माहेरी आले असताना मुरलीधर यांच्या वडिलांनी त्यांना न विचारता परस्पर जमिनीची वाटणी करून बहिणींना हिस्सा दिला. पोटचा गोळा गमावलेला असतानाच घरच्यांनी असा निर्णय घेतल्याने मुरलीधर यांना प्रचंड अपमानित वाटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *