![]()
संत एकनाथ महाराजांच्या तब्बल ४२७ वर्षांच्या अखंड पालखी परंपरेसमोर आता मार्ग बदलण्याचे संकट उभे ठाकले आहे. सध्या नाथांची पालखी धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात आहे. या जिल्ह्यातून नाथांची पालखी शतकानुशतके ज्या पारंपरिक मार्गाने पंढरपूरकडे प्रस्थान करते, त्या मार्गाऐवजी दुसऱ्याच मार्गावर रस्त्याची कामे हाती घेण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे नाथांच्या पालखीचा प्रवास ९ कि.मी. अधिकचा होणार असल्याचे संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख रघुनाथबुवा गोसावी यांनी सांगितले. धाराशिव जिल्ह्यातील देवगाव-खंडेश्वरवाडी- नांगरडोह हा संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा पारंपरिक मार्ग आहे. मात्र काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडचणींचे कारण पुढे करून देवगाव-ताकमोठवाडी-जे कटेवाडी-नांगरडोह असा पर्यायी मार्ग विकसित केला जात आहे. हा मार्ग सुमारे ८ ते ९ किलोमीटरने अधिक लांब असून, परंपरेतील महत्त्वाचे खंडेश्वरवाडी गाव पूर्णपणे वगळले जात आहे. त्यामुळे शेकडो वर्षांची धार्मिक परंपरा आणि गावांचा ऐतिहासिक सहभाग धोक्यात येत असल्याची भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बीड जिल्ह्यातील गारमाथा परिसरात डोंगर-दऱ्यांमधून तयार करण्यात आलेला पर्यायी मार्ग पालखीच्या रथासाठी सुरक्षित नसल्याचेही पालखी प्रमुख रघुनाथ महाराज यांनी सांगितले. त्यामुळे वारकऱ्यांना खडतर चढ-उतारातून पायी प्रवास करावा लागत असून वृद्ध, महिला आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने संपूर्ण पालखी मार्गाचे नव्याने सर्वेक्षण करून मूळ पारंपरिक मार्गालाच अधिकृत मान्यता द्यावी व त्याचे तातडीने डांबरीकरण करावे, अशी ठाम मागणी रघुनाथबुवा गोसावी यांनी केली आहे. या आहेत प्रमुख मागण्या संत एकनाथ महाराजांच्या पारंपरिक पालखी मार्गालाच अधिकृत मान्यता द्यावी. मूळ मार्गाचे त्वरित डांबरीकरण करण्यात यावे. पर्यायी मार्गाऐवजी इतिहास जपणारा मूळ मार्ग कायम ठेवावा. पालखी मार्गावर आरोग्य, सुरक्षा, पिण्याचे पाणी व मुक्कामाच्या सुविधा वाढवाव्यात. निर्मल वारी योजनेत संत एकनाथ महाराज पालखीचा समावेश करावा. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार Ãपालखीचा मार्ग हा केवळ रस्ता नसून, तो संत परंपरा, वारकरी संस्कृती आणि शेकडो गावांच्या श्रद्धेचा वारसा आहे. त्यामुळे विकासकामांच्या नावाखाली पारंपरिक मार्ग बदलण्याऐवजी तो जतन करण्याची गरज आहे. या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ. -रघुनाथ महाराज पालखीवाले, पालखी प्रमुख नाथ महाराज
Source link
पारंपरिक मार्गाला बगल:427 वर्षांची परंपरा; नाथांच्या पालखीचा मूळ मार्ग बदलल्याने वारकऱ्यांमध्ये संताप