![]()
पारनेर आगाराच्या ताफ्यात पाच नवीन राजमाता जिजाऊ बस दाखल झाल्या आहेत. आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते या बसेसचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले. महामंडळाच्या अन्य बसच्या तुलनेत या नवीन बस अत्याधुनिक आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आमदार दाते म्हणाले, राज्य सरकार विविध घटकांतील नागरिकांना प्रवास दरात मोठ्या प्रमाणावर सवलती देते. लाडक्या बहिणींना निम्म्या दरात प्रवास करण्याची संधी सरकारने दिली आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. या प्रवाशांसाठी महामंडळाला ३ हजार नवीन बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने मार्च २०२६ मध्ये घेतला होता. त्यानुसार प्रत्येक आगाराला टप्याटप्प्याने बस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. उत्पन्नाच्या दृष्टीने पारनेर आगार अहिल्यानगर विभागात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे पारनेर आगाराला जास्तीत जास्त नवीन गाड्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना केली होती. आत्तापर्यंत १५ नवीन बस मिळाल्या आहेत. या बसमध्ये अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. प्रत्येक बसमध्ये चार सीसीटीव्ही कॅमेरे, रिअर व्ह्यू कॅमेरा, प्रत्येक आसनाजवळ चार्जिंग पॉईंट, पॅनिक बटन बसवण्यात आले आहे. बसमध्ये आसन क्षमता वाढवण्यात आली आहे. त्यामुळे जास्त प्रवासी बसतील. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित होणार असल्याचे आगारप्रमुख अमोल कोतकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, वाहतूक निरीक्षक इंद्रनील कुसकर, पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, शंकरराव नगरे, दत्ता पवार, नगरसेवक अशोक चेडे, युवराज पठारे आदी उपस्थित होते.
Source link
पारनेर आगारात पाच नवीन राजमाता जिजाऊ बस दाखल:आमदार काशिनाथ दातेयांच्या हस्ते लोकार्पण