![]()
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोणसई येथे एका अनधिकृत फटाका कारखान्यात आज दुपारी भीषण स्फोट झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत भावेश दिलीप वावरे (२५) या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून, चार महिला कामगार गंभीर जखमी झाल्या आहेत. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या या मृत्यूच्या कारखान्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोणसई परिसरात एका शेतात सुतळी बॉम्ब आणि इतर घातक फटाक्यांचे उत्पादन अनधिकृतपणे सुरू होते. आज अचानक झालेल्या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, त्याचा आवाज परिसरात दूरवर ऐकू आला. स्फोटानंतर कारखान्याला मोठी आग लागली. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी कारखान्यात सुमारे ३२ कामगार काम करत होते. सुदैवाने बहुतांश कामगार बाहेर असल्याने मोठी जीवितहानी टळली. जखमींची प्रकृती चिंताजनक मोनिका पडवळे, मोनिका जाधव, अर्चना मिसाळ, जयश्री रावते अशी जखमी कामगारांची नावे आहे. या जखमी झालेल्या महिलांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी एका महिला कामगाराची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच वाडा तालुक्यात सुरू असलेल्या सर्व अनधिकृत फटाके कारखान्यांवर तातडीने कारवाई करून त्यांना बंद करण्यात यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे संकेत दिले असून पुढील तपास सुरू आहे. प्रशासकीय दुर्लक्ष की मूकसंमती? स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. “कोणतीही परवानगी नसताना आणि सुरक्षा उपाययोजना नसताना हा कारखाना भरवस्तीच्या जवळ सुरू कसा होता?” असा सवाल नागरिक विचारत आहेत. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाच्या डोळ्यांदेखत हे बेकायदेशीर उद्योग सुरू असल्याचा गंभीर आरोपही स्थानिकांनी केला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास विलंब झाला, ज्यामुळे नुकसानीची तीव्रता वाढली.
Source link
पालघर हादरले:अनधिकृत फटाका कारखान्यात भीषण स्फोट; एका कामगाराचा मृत्यू, 4 महिला गंभीर; वाडा येथील घटना