![]()
पुण्यातील पिंपरी येथील मोरवाडीतील करिष्मा ग्लोरी सोसायटीमध्ये आर्थिक विवंचनेतून विषारी पदार्थ सेवन केलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. पती विनोद पिळे यांच्या मृत्यूनंतर उपचाराधीन असलेल्या पत्नी सिरजा पिळे आणि मुलगी पूर्णिमा पिळे यांचीही प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये विनोद पिळे (वय 50), त्यांची पत्नी सिरजा पिळे (वय 45) आणि मुलगी पूर्णिमा पिळे (वय 19) यांचा समावेश आहे. पिळे कुटुंब मोरवाडीतील करिष्मा ग्लोरी सोसायटीमधील एका सदनिकेत राहत होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आर्थिक अडचणींमुळे या कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचा निर्णय घेतला होता. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी आणि विषारी पदार्थाची बाटली सापडली आहे. चिठ्ठीत आर्थिक विवंचनेचा उल्लेख असून, या निर्णयासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे नमूद केले आहे. घटनेच्या रात्री मुलगी पूर्णिमाने सोशल मीडियावर एक भावनिक मजकूर प्रसिद्ध केला होता. नातेवाईकांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर जवळ राहणाऱ्या नातेवाईकांनी घरी जाऊन पाहिले असता, दरवाजा आतून बंद होता. दरवाजा उघडल्यानंतर कुटुंबातील तिघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले. तिघांना तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी विनोद पिळे यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. सिरजा आणि पूर्णिमा यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते, मात्र प्रकृती अधिक खालावल्याने उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. पिळे कुटुंबाने तीन वर्षांपूर्वी त्यांचे राहते घर विकून मोरवाडीत भाड्याने राहायला सुरुवात केली होती. या प्रकरणाचा अधिक तपास संत तुकारामनगर पोलिसांकडून सुरू आहे.
Source link
पिंपरीत शोककळा:आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील तिघांची सामूहिक आत्महत्या