Headlines

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 2.64 कोटींचे अंमली पदार्थ केले नष्ट:156 गुन्ह्यांमधील मुद्देमाल शिरूर येथील भट्टीमध्ये जाळला




पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल २ कोटी ६४ लाख १३ हजार ७१० रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रंजनगाव एमआयडीसी येथील ‘महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड’ च्या प्लांटमध्ये हा साठा जाळून नष्ट करण्यात आला. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार, आयुक्तालय हद्दीतील एकूण १५६ गुन्ह्यांमधील जप्त करण्यात आलेल्या या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंमली पदार्थ नष्ट करण्यासाठी एक विशेष उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमध्ये अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड हे अध्यक्ष होते, तर पोलीस उप आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-१) संदीप आटोळे हे सदस्य म्हणून कार्यरत होते. या समितीच्या थेट देखरेखीखाली आणि उपस्थितीत ही विल्हेवाटीची प्रक्रिया अत्यंत सुरक्षितपणे पार पाडण्यात आली. नष्ट करण्यात आलेल्या या साठ्यामध्ये विविध प्रकारच्या अंमली पदार्थांचा समावेश होता. यामध्ये तब्बल ३१५ किलो गांजा, ७६१ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.), १२ किलो अफूची झाडे, ३०० ग्रॅम ब्राऊन शुगर आणि १०९ किलो डुडा या अंमली पदार्थांचा समावेश होता. विल्हेवाटीची संपूर्ण प्रक्रिया राबवताना प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा (पुणे), राज्य उत्पादन शुल्क आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रतिनिधींची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती. यामुळे प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखली गेली आणि पर्यावरणाची देखील योग्य काळजी घेण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *