Headlines

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश:दुष्काळसदृश स्थितीतील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही




कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीकडे शासन गांभीर्याने पाहत आहे. मुख्यमंत्र्यांनी आजपासूनच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात पहिली अधिसूचना निघणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. कोणत्याही परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. झालेल्या नुकसानीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे भरणे म्हणाले. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठीही आवश्यक नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. कृषीमंत्री भरणे पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यांच्या दौऱ्यावर होते. त्यांनी देऊळगाव, मोरगाव, मुर्टी, नावळी आणि कोळविहीरे या गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची आणि पाणी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. आमदार राहुल कुल आणि पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यावेळी उपस्थित होते. पावसातील खंडामुळे खरीप पिकांवर झालेल्या परिणामाची माहिती घेण्यासाठी कृषीमंत्री भरणे यांनी ही पाहणी केली. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुणे जिल्ह्यातील पावसाच्या खंडाची माहिती दिली. हवेली, जुन्नर, आंबेगाव, मावळ आणि मुळशी तालुक्यांमध्ये २ ते ३ आठवड्यांचा पावसाचा खंड आहे. भोर व वेल्हा तालुक्यांमध्ये ३ ते ४ आठवड्यांचा पावसाचा खंड पडला आहे. बारामती, शिरूर, पुरंदर, इंदापूर, दौंड आणि खेड या तालुक्यांमध्ये ४ आठवड्यांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड आहे. या दीर्घ खंडामुळे पुणे विभागातील खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. या परिस्थितीची केवळ आकडेवारीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतात जाऊन वस्तुस्थिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे, असे कृषीमंत्री भरणे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, कृषी व संबंधित विभाग शेतावर जाऊन नुकसानीची अचूक नोंद करत आहेत. पावसातील खंड, पिकांची सद्यस्थिती आणि त्याचा पिकांवर झालेला परिणाम लक्षात घेऊन पंचनामे आणि आवश्यक प्रस्तावांची कार्यवाही तातडीने पूर्ण केली जाईल, असा विश्वासही कृषीमंत्री भरणे यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *