![]()
‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवारी (२१ ऑगस्ट) केलेल्या कारवाईत क्रांती चौकातील मे. गायत्री मेवाड प्रायव्हेट लिमिटेड आणि बीड बायपास रोड, सातारा परिसरातील मेसर्स छप्पन भोग थाळी रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल या दोन्ही आस्थापनांचे अन्न सुरक्षा परवाने निलंबित केले. गायत्री मेवाडमध्ये स्वयंपाकघरात भाजीसाठी कापून ठेवलेले पनीर दुर्गंधीयुक्त आढळले. तयार ग्रेव्ही व अन्य पदार्थ कधी तयार केले आणि किती वेळेत वापरायचे, याची नोंद नव्हती. शौचालयाच्या प्रवेशद्वाराजवळ भाज्या कापल्या जात होत्या, तर वॉशिंग एरियामध्ये उकडलेले नूडल्स उघडे ठेवले होते. तळणीचे तेल काळेकुट्ट झालेले होते. कच्चा अन्नसाठाही अस्वच्छ पद्धतीने ठेवला होता. या आस्थापनेवर यापूर्वी सुधारणा नोटीस तसेच ५० हजारांचा दंड झाला होता. अन्न विक्रीला पूर्ण बंदी : दोन्ही आस्थापनांचे परवाने अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील कलम ३२(३) नुसार निलंबित करण्यात आले आहेत. निलंबन काळात अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, विक्री किंवा वितरण करण्यास बंदी घातली आहे. छप्पन भोगमध्ये पिठात कीटक : छप्पन भोगच्या स्टोअररूममध्ये ठेवलेल्या ज्वारी आणि बाजरीच्या पिठात जिवंत कीटक आढळले. अन्न साठवणुकीत नियमांचे पालन नव्हते. खाद्यपदार्थ, रसायने आणि अन्य साहित्याची स्वतंत्र साठवण व्यवस्था नव्हती. पिण्याच्या पाण्याची तपासणी, अन्नपदार्थांच्या प्रयोगशाळा चाचण्या, पुरवठादारांची माहिती आणि स्वयंपाकाच्या तेलाच्या वापराची नोंदही उपलब्ध नव्हती. स्वच्छता व्यवस्थाही अपुरी आढळली.
Source link
पिठात चक्क कीटक, अन् काळे तेल:गायत्री मेवाड अन् छप्पन भोगचा परवाना निलंबित, दोन्ही हॉटेलमध्ये अन्नसुरक्षेचे गंभीर उल्लंघन, अन्न् व औषध प्रशासनाची कारवाई