![]()
अहिल्यानगर आजच्या डिजिटल युगात एका क्लिकवर संदेश पोहोचतो; मात्र एकेकाळी प्रियजनांच्या पत्राची वाट पाहण्यातच संवादाचा आनंद सामावलेला असायचा. पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र, लिफाफा आणि तार अशा जुन्या संदेशवहन साधनांचा विस्मृतीत चाललेला ठेवा नव्या पिढीसमोर उलगडण्याचा अनोखा उपक्रम पाथर्डीतील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राबवण्यात आला. मुख्याध्यापिका नंदा तुपे-चौधरी यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात पोस्ट खात्यातील ऋतिक धनगर यांनी विद्यार्थ्यांना जुन्या संदेशवहन साधनांची माहिती दिली. पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र, लिफाफा आणि तार यांचा वापर कसा केला जात असे, पत्र पाठविण्याची प्रक्रिया काय होती आणि पोस्ट खाते संदेश पोहोचविण्याचे काम कसे करत असे, याची माहिती त्यांनी दिली. प्रा. सूर्यकांत काळोखे यांनी जुन्या संवादपद्धतीतील भावनिक जिव्हाळा विद्यार्थ्यांसमोर मांडला. पत्राची आतुरतेने वाट पाहणे, पत्र मिळाल्यानंतर होणारा आनंद आणि तार मिळाल्यानंतर निर्माण होणारी उत्सुकता अशा आठवणींना त्यांनी उजाळा दिला. मोबाईल आणि इंटरनेटमुळे संवाद वेगवान झाला असला, तरी पत्रलेखनातून व्यक्त होणारी आपुलकी आणि भावनिक नाते आजही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ जुन्या साधनांची माहिती मिळाली नाही, तर संवादाच्या बदलत्या प्रवासाचाही परिचय झाला. प्रत्यक्ष मार्गदर्शनातून इतिहास आणि तंत्रज्ञानातील बदल समजून घेण्याची संधी त्यांना मिळाली. कार्यक्रमाला सुरेखा बडे, छाया चंदनशिवे, मंदा पालवे, मनीषा फटांगरे, ज्योती थोरात आणि साक्षी वीर उपस्थित होत्या. जुन्या संवादपद्धतीतील भावनिक जिव्हाळा विद्यार्थ्यांसमोर मांडताना प्रा. सूर्यकांत काळोखे. मोबाईलपूर्वी संवादाची चार महत्त्वाची साधने! { पोस्टकार्ड : कमी खर्चात संदेश पाठविण्याचे साधन. { आंतरदेशीय पत्र : देशांतर्गत दूरवरच्या व्यक्तींशी पत्रव्यवहार करण्यासाठी वापरले जाणारे बंद पत्र. { लिफाफा : पत्र किंवा कागदपत्रे सुरक्षितपणे पाठविण्याचे साधन. तार : तातडीचा संदेश कमी शब्दांत पोहोचविण्याची व्यवस्था.
Source link
पीएमश्री शाळेत पोस्टकार्ड:अंतर्देशीय पत्र आणि तारेच्या आठवणींना उजाळा, पीएमश्री शाळेत पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्र आणि तारेच्या आठवणींना उजाळा