![]()
नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर अत्याचार आणि धर्मांतराचा दबाव टाकल्याच्या प्रकरणात विशेष तपास पथकाकडून सुरू असलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू असून, तपासादरम्यान अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. पीडित तरुणीचे केवळ मतपरिवर्तन करण्याचाच प्रयत्न झाला नाही, तर तिच्या घरात जाऊन धार्मिक विधी केल्याचेही तपासात समोर आले आहे. तसेच पीडितेला विशिष्ट धर्माच्या प्रार्थना करण्यासाठी भाग पाडण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे. तपास अधिक खोलात गेल्यानंतर संशयित निदा खान हिने पीडितेचे नाव बदलण्याचाही कट रचल्याचे उघड झाले आहे. तरुणीचे मूळ नाव बदलून ‘हानिया’ असे नाव ठेवण्याची तयारी सुरू होती, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासाठी पीडितेला धार्मिक विचारसरणीशी संबंधित 171 लिंक पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे. या लिंकच्या माध्यमातून तिचा मानसिक प्रभाव टाकून पूर्णपणे ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. एवढेच नव्हे, तर निदा खान पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक शिक्षण देत होती, तिला विशिष्ट प्रकारचा पोशाख घालण्यास सांगत होती आणि नियमित प्रार्थना करण्यासाठी दबाव आणत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. 26 मार्चपासून फरार असलेल्या निदा खानला 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली होती. ती ज्या फ्लॅटमध्ये लपून राहत होती, तो फ्लॅट तिच्या मावशीचा नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. हा फ्लॅट संशयित एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी उपलब्ध करून दिल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. निदा खान गर्भवती असल्यामुळे तिच्यासोबत तिचे आई-वडील आणि मावशीदेखील त्या ठिकाणी राहत होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आर्थिक मदत, आश्रय आणि संपर्कांचे जाळे किती मोठे आहे, याचा तपास आता पोलिस करत आहेत. एसआयटीकडून आता निदा खानच्या संपर्कातील व्यक्तींचीही माहिती गोळा केली जात आहे. ती एमआयएमच्या नगरसेवकांपर्यंत कशी पोहोचली, फरार असताना तिला मदत कोणी केली, तिच्या हालचालींचा खर्च कोणी उचलला, या सर्व बाबींचा तपास सुरू आहे. पोलिसांनी तिच्या मोबाइलमधील माहिती ताब्यात घेतली असून, त्यातील डिलिट केलेले मेसेज, व्हिडीओ आणि संपर्क क्रमांक पुन्हा मिळवण्यासाठी मोबाइल क्लोनिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. या तपासातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, निदा खानची पोलिस कोठडी सोमवारी संपत असल्याने तिला पुन्हा नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपासातील गंभीर बाबी आणि उपलब्ध होत असलेले पुरावे लक्षात घेता पोलिसांकडून तिच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली जाणार आहे. या प्रकरणातील इतर संशयित दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांचाही ताबा एसआयटी घेणार असून, तिघांची समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून कटाची संपूर्ण साखळी समोर येण्याची शक्यता आहे. नवे धक्कादायक तपशील समोर निदा खान आणि तिच्या साथीदारांविरोधात नाशिकमध्ये आतापर्यंत अत्याचार, विनयभंग, धार्मिक भावना दुखावणे आणि कट रचून धर्मांतर करण्यासारख्या गंभीर कलमांखाली नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई नाका पोलिसांनीही या प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुरू केला आहे. कॉल डिटेल्स, लोकेशन हिस्ट्री, प्रवासाची माहिती आणि वारंवार संपर्कात असलेल्या व्यक्तींची माहिती तपासली जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून, तपास जसजसा पुढे जात आहे तसतसे नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत.
Source link