Headlines

पुणे जिल्ह्यात दरड कोसळली; दोन घाटमार्ग विस्कळीत:वरंध घाट, कुसगाव खिंडीत वाहतूक ठप्प; प्रशासन सतर्क




पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दोन महत्त्वाच्या घाटमार्गांवर दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. भोर-महाड मार्गावरील वरंध घाट आणि खेडशिवापूर ते राजगड तालुक्याला जोडणाऱ्या कुसगाव खिंडीत दरडी कोसळल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पंढरपूर-महाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 डीडी अंतर्गत येणाऱ्या वरंध घाटात शिरगाव गावाच्या हद्दीत आज मोठी दरड कोसळली. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ही घटना घडली. दरडीसोबत माती, मोठे दगड आणि झाडेझुडपांचा राडारोडा थेट रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सुदैवाने, दरड कोसळली तेव्हा रस्त्यावर कोणीही नसल्याने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच भोर प्रशासनाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रस्त्यावरील राडारोडा बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पुढील तासाभरात रस्ता साफ करून वाहतूक सुरळीत केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली. दुसरीकडे, खेडशिवापूर ते राजगड तालुक्याला जोडणाऱ्या कुसगाव खिंड मार्गावरही मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे बंद झाली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवल्यानंतर प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरील दगड आणि माती हटवून हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत केला. येथेही कोणतीही दुर्घटना किंवा हानी झाली नाही. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता प्रशासनाने प्रवाशांना आणि पर्यटकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्यास रात्रीच्या वेळी घाटमार्गातून प्रवास करणे टाळावे. तसेच, दिवसा पर्यटनाच्या नावाखाली घाटात अनावश्यक गर्दी करू नये. छायाचित्रण, सेल्फी किंवा व्हिडिओ शूटिंगसाठी घाटांमध्ये थांबणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पर्यटकांनी अशा ठिकाणी विनाकारण थांबू नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *