Headlines

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे उद्घाटन, 'तेजस्विनी' पुरस्कार प्रदान:नीलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते; अनुराधा ओक, प्रियांका इंगळे सन्मानित, महिलांना स्वतःसाठी वेळ काढण्याचे आवाहन




महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या २८ व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे उद्घाटन मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी, अभिनेत्री व दिग्दर्शिका नीलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते सोमवारी (ता. १२) शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात झाले. यावेळी बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक आणि भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार प्रियांका इंगळे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘तेजस्विनी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर युवा कलाकारांनी ‘आई गिरीनंदिनी’ या देवीगीतावर नृत्य सादर केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. हा महोत्सव १२ ते १८ ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यंदा बालभारती संस्थेच्या स्थापनेचे ६० वे वर्ष सुरू असून, संस्थेच्या संचालिका अनुराधा ओक यांनी शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार स्वीकारला. तसेच पहिल्या महिला खो-खो विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय महिला संघाची कर्णधार प्रियांका इंगळे हिचाही गौरव करण्यात आला. पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, देवीची प्रतिमा, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. याशिवाय १५० हून अधिक गुरुजनांचा स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. महिलांनी स्वतःसाठी वेळ काढावा नीलम शिर्के-सामंत यांनी मिश्किल शैलीत संवाद साधत महिलांना स्वतःच्या क्षमतांची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, “प्रत्येक महिलेच्या अंगात नवदुर्गा असतात. त्यांची जाणीव होणे आणि गरजेनुसार त्या शक्तीचे योग्य रूप दाखवणे आवश्यक आहे. महिलांवर अनेक ताण असतात; मात्र हसतमुख राहून जीवनातील आनंद शोधला पाहिजे. हसण्याची एकही संधी सोडू नका. महिलांनी दिवसातून किमान १५ मिनिटे स्वतःसाठी द्यावीत. आपल्याला करावेसे वाटते, पण आजवर करता आले नाही, अशी एखादी गोष्ट करण्यासाठी हा वेळ वापरावा.” महिलांनी महिलांसाठी मोठे व्यासपीठ निर्माण करणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून त्यांनी रंगभूमीच्या माध्यमातून राज्यातील अडीच ते तीन लाख मुलांसाठी काम करत असल्याचे नमूद केले. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राज्यभर प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘महिलांची आंतरिक प्रेरणा ऊर्जा देते’ अनुराधा ओक म्हणाल्या, “नवरात्र म्हटले की महिलांमधील एक वेगळी ऊर्जा जागृत होते. आजचा सन्मान म्हणजे आपल्या कुटुंबाचाच सन्मान झाल्यासारखे वाटते.” बालभारतीच्या कार्याविषयी बोलताना त्यांनी दहा भाषांमधून पाठ्यपुस्तकांची निर्मिती आणि वितरण करण्याची जबाबदारी संस्था पार पाडत असल्याचे सांगितले. नवीन पाठ्यपुस्तके तयार करताना अनेक अडचणी आल्या; मात्र अथक परिश्रमांतून हे आव्हान पेलता आले. महिलांमधील आंतरिक प्रेरणा त्यांना ऊर्जा देते. मुलांना चांगले शिक्षण दिल्यास ते उद्याचे जबाबदार नागरिक बनतील, असेही त्यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *