![]()
पुणे शहर पोलिसांनी सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अत्याधुनिक डिजिटल प्रणालींचा प्रभावी वापर सुरू केला आहे. या प्रयत्नांमुळे नागरिकांची फसवणुकीतील लाखो रुपयांची रक्कम परत मिळवण्यात यश आले आहे. महाराष्ट्र सायबर, इंडियन सायबर गुन्हे समन्वय केंद्र (आय-फोर-सी) आणि राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल यांच्या समन्वयातून ही कारवाई केली जात आहे. रक्कम परतावा प्रणालीच्या माध्यमातून सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यात आला. बँका आणि वित्तीय संस्थांच्या सहकार्याने आतापर्यंत २,५३८ तक्रारींमध्ये तब्बल ८० लाख २७ हजार ३०२ रुपये संबंधित तक्रारदारांना परत मिळवून देण्यात आले आहेत. पाच लाख रुपयांवरील आर्थिक फसवणुकीसाठी ‘शून्य प्रथम माहिती अहवाल’ (ई-झिरो एफआयआर) सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत आतापर्यंत २७ प्रकरणांची नोंद झाली आहे. नागरिकांना १९३० हेल्पलाईन किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी संकेतस्थळावरून त्वरित तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय, तक्रार निवारण प्रणाली, समन्वय प्रणाली, सहकार्य प्रणाली आणि सायबर तपास सहाय्य विनंती प्रणाली यांच्या माध्यमातून तपास, समन्वय आणि समाजमाध्यमांवरील आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. सहकार्य प्रणालीद्वारे आतापर्यंत ८४५ आक्षेपार्ह पोस्ट किंवा दुवे हटवण्यात आले आहेत, तर २०२४ पासून १५२ सायबर गुन्हेगारांची माहिती समन्वय प्रणालीत नोंदविण्यात आली आहे. ‘ऑपरेशन म्यूल हंट’ अंतर्गत संशयित बँक खात्यांचा मागोवा घेऊन पुण्यात आतापर्यंत १३२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. सायबर तपास अधिक सक्षम करण्यासाठी पोलिसांना विशेष ऑनलाइन प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच, शाळा, महाविद्यालये, आयटी कंपन्या आणि सरकारी कार्यालयांमध्ये १,१४२ जनजागृती कार्यक्रम घेऊन सुमारे तीन लाख नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचवण्यात आला आहे. हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यासाठी केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी प्रणालीचा (CEIR) प्रभावी वापर करण्यात येत आहे. या प्रणालीद्वारे आतापर्यंत १,०९७ मोबाईल शोधून संबंधितांना परत देण्यात आले आहेत. नागरिकांनी ओटीपी, सीव्हीव्ही, पिन किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, तसेच फसवणूक झाल्यास तातडीने १९३० हेल्पलाईन किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
Source link
पुणे पोलिसांकडून सायबर फसवणुकीतील 80.27 लाख रुपये परत:अत्याधुनिक डिजिटल प्रणालींचा वापर करून नागरिकांना दिलासा