![]()
देशात उच्च दर्जाच्या स्फोटक उत्पादनात वाढ करणे आवश्यक आहे. सध्या संरक्षण उत्पादनांची मागणी केवळ देशांतर्गत नसून जगभरात आहे. ही एक दुर्मिळ संधी असून, भारताने याचा फायदा घ्यावा, असे मत संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीव कुमार यांनी व्यक्त केले. पुण्यात गुणवत्ता सिद्धता महासंचनालय (डीजीक्यूए) यांच्या वतीने ‘मिलिट्री एक्सप्लोझिव्ह अँड प्रोपोलन्स सेफ्टी अँड कॉम्प्लेन्सन’ या विषयावर आधारित राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संजीव कुमार यांच्यासह सहसंचालक गरिमा भगत, संरक्षण उत्पादन विभागाचे महासंचालक एन. मनोहरन आणि डॉ. टी. के. वरदराजन उपस्थित होते. संजीव कुमार यांनी सांगितले की, देशांतर्गत साधनांचा वापर करून संरक्षण उत्पादन वाढवण्यावर भर दिला पाहिजे. यामुळे देशाचे पैसे, वेळ आणि उत्पादन क्षमता वाचेल. या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी सर्व परवाने आणि उत्पादन प्रक्रिया एकाच छताखाली आणली जात आहे. मागील काही काळात संरक्षण विभागात स्फोटकांशी संबंधित दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे स्फोटक उत्पादन आणि वापराबाबत सुरक्षितता बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा दुर्घटनांमध्ये व्यक्तीचा मृत्यू झाल्यास भरपाई मिळते, पण कुटुंबाला मिळणारा भावनिक आधार गळून पडतो आणि कधीही भरून न येणारी हानी होते. संरक्षण विभागात नवीन तंत्रज्ञान येत असताना केवळ उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित न करता प्रकल्पाची सुरक्षा देखील तितकीच महत्त्वाची आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी वेळीच आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षा मानकांची योग्य अंमलबजावणी करावी. मानवी चुका टाळण्यासाठी यंत्राधारित संवेदनशील उत्पादन पद्धतींचा विचार करता येईल का, याबाबत आगामी काळात विचार केला जाईल, असे कुमार म्हणाले. एन. मनोहरन यांनी सांगितले की, शत्रूची लक्ष्ये उद्ध्वस्त करण्यासाठी स्फोटके महत्त्वाची असतात. ती बाळगताना काळजीपूर्वक हाताळणी आवश्यक आहे. त्यांची निर्मिती, साठवणूक, वाहतूक, लक्ष्यावर डागणे आणि नष्ट करणे या सर्व बाबींकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत स्फोटक निर्मितीसाठी अनेक कंपन्या पुढे आल्या आहेत. स्फोटक निर्मितीवेळी आणि वापरताना धोके कमी करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित हाताळणी करणे गरजेचे आहे, यासाठी आजचा सेमिनार महत्त्वाचा ठरला. मोठ्या प्रमाणात स्फोटक उत्पादित करताना त्याची पुरेशी काळजी घेऊन जबाबदारी निश्चित करावी लागते, त्यानंतरच सुरक्षा प्रमाणपत्र मिळू शकते.
Source link
संरक्षण उत्पादनाची मागणी केवळ देशातच नव्हे, तर जगभरात:संधीचा फायदा घ्या; सचिव संजीव कुमार यांचे आवाहन