![]()
पुणे आणि परिसरातील वाढत्या औद्योगिक व व्यावसायिक उलाढालीच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळाने कार्गो वाहतुकीत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या आठ महिन्यांत पुणे विमानतळावरून ४५,०५०.७ मेट्रिक टन कार्गोची हाताळणी करण्यात आली असून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ ४३.९ टक्के आहे. विशेष म्हणजे २०२६ मधील या आठही महिन्यांत कार्गो वाहतुकीत सातत्याने वाढ नोंदविण्यात आली आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत पुणे विमानतळावर ३१,३०३.७ मेट्रिक टन कार्गोची हाताळणी झाली होती. यंदा त्यात तब्बल १३,७४७ मेट्रिक टनांची भर पडून एकूण कार्गो वाहतूक ४५ हजार मेट्रिक टनांच्या पुढे गेली आहे. महिनानिहाय आकडेवारीतही पुणे विमानतळाची कामगिरी लक्षणीय राहिली आहे. मे आणि ऑगस्ट २०२६ मध्ये कार्गो वाहतुकीने सहा हजार मेट्रिक टनांचा टप्पा पार केला. मे महिन्यात सर्वाधिक ६,१४७.८ मेट्रिक टन, तर ऑगस्टमध्ये ६,०४६.८ मेट्रिक टन कार्गोची हाताळणी करण्यात आली. ऑगस्टमधील वाढ गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत सुमारे ४५.९ टक्के आहे. देशांतर्गत कार्गो वाहतुकीतही मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या कालावधीतील ३१,२४१.३ मेट्रिक टनांवरून यंदा ती ४४,८२२ मेट्रिक टनांवर पोहोचली असून, ही वाढ सुमारे ४३.५ टक्के आहे. आंतरराष्ट्रीय कार्गो वाहतुकीतील वाढ विशेष उल्लेखनीय ठरली आहे. गेल्या वर्षी पहिल्या आठ महिन्यांत ६२.४ मेट्रिक टन असलेली आंतरराष्ट्रीय कार्गो वाहतूक यंदा २२८.७ मेट्रिक टनांवर पोहोचली आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय कार्गोची हाताळणी तीन पटींहून अधिक वाढली आहे. या कामगिरीबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुणे विमानतळावरील कार्गो वाहतुकीत झालेली भरीव वाढ ही पुणे आणि परिसरातील विस्तारत्या आर्थिक व औद्योगिक क्षमतेचे सकारात्मक निदर्शक आहे. उत्पादन, ऑटोमोबाईल, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माण यांसारख्या उच्च मूल्यवर्धित क्षेत्रांचे पुणे हे महत्त्वाचे केंद्र आहे. या उद्योगांच्या विकासासाठी सक्षम आणि वेगवान एअर-कार्गो कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची आहे.” “२०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताच्या नागरी हवाई वाहतूक क्षेत्राने अभूतपूर्व विस्तार आणि परिवर्तन अनुभवले आहे. देशातील विमानतळांची वाढती संख्या, देशांतर्गत आणि प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटीचा विस्तार तसेच विमान वाहतूक पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण यामुळे नागरी हवाई वाहतूक क्षेत्र देशाच्या आर्थिक विकासाचे एक महत्त्वाचे ग्रोथ इंजिन म्हणून पुढे आले आहे. या परिवर्तनाचा लाभ पुण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्रांनाही होत आहे,” असे मोहोळ यांनी नमूद केले.
Source link
पुणे विमानतळाच्या कार्गो वाहतुकीत मोठी वाढ:पहिल्या आठ महिन्यांत तब्बल 44 टक्क्यांची वाढ, आंतरराष्ट्रीय कार्गो तीन पटींहून अधिक