![]()
श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने रविवार, ११ ऑक्टोबरपासून मंगळवार, २० ऑक्टोबरपर्यंत सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रमांसोबत सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांची रेलचेल असलेल्या या उत्सवात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. मंदिर ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रविवारी सकाळी ९ वाजता बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे व सुप्रिया बडवे यांच्या हस्ते घटस्थापना होईल. सायंकाळी ६ वाजता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन होणार आहे. यंदा ‘शृंगार’ ही उत्सवाची संकल्पना असून त्यानुसार मंदिराची सजावट व भव्य प्रवेशद्वार साकारण्यात येणार आहे. घटस्थापनेच्या दिवशी श्री महालक्ष्मी देवीला दोन किलो वजनाचा नवा सोन्याचा मुकुट परिधान करण्यात येणार आहे. तसेच दसऱ्याला देवीला सोन्याची साडी नेसविण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी ६ वाजता सामूहिक श्रीसूक्त पठण होणार असून हजारो भाविक सहभागी होणार आहेत. त्याच दिवसापासून दररोज सायंकाळी विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जाणार आहे. यात महिला शेतकरी, शास्त्रज्ञ, पोलीस अधिकारी, वैमानिक, जिल्हाधिकारी, उद्योजिका आदींचा समावेश आहे. १३ ऑक्टोबरला अष्टलक्ष्मीची भव्य मिरवणूक, १५ ऑक्टोबरला कन्यापूजन आणि १६ ऑक्टोबरला ‘गाथा शिवशंभूंची’ हा जिवंत देखावा होणार आहे. रक्तदान व आरोग्य शिबिर, चित्रकला स्पर्धा, नृत्यातून देवी आराधना, ढोल-ताशा वादन यांसह १९ ऑक्टोबरला सामूहिक गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. दसऱ्याला रात्री ९.३० वाजता रावणदहन होईल. भाविकांच्या सुरक्षेसाठी पाच कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला असून परिसरात ५० सीसीटीव्ही कॅमेरे व ५० हून अधिक सुरक्षारक्षक तैनात असतील.
Source link
सारसबागेतील महालक्ष्मी मंदिरात रविवारपासून सार्वजनिक नवरात्रोत्सव:नारीशक्तीचा सन्मान, अष्टलक्ष्मी मिरवणूक, जिवंत देखावा व सामूहिक गरब्याचे आयोजन