Headlines

पुण्यातील दत्त मंदिरात 25 लाख फुलांची सजावट:संस्थापिका लक्ष्मीबाईंच्या पुण्यस्मरणानिमित्त वासंतिक पुष्पोत्सव




पुण्यातील बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात वासंतिक पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या संस्थापिका श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सत्तू अमावस्येच्या दिवशी या उत्सवाला सुरुवात झाली. यावर्षी तब्बल २५ लाख विविध सुवासिक फुलांनी मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ही मनोहारी फुलांची आरास पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली. या पुष्पोत्सवासाठी जाई, जुई, मोगरा, लिली, शेवंती, सोनचाफा, तगर, निशिगंध यांसारख्या शोभिवंत फुलांची आरास करण्यात आली आहे. मोगऱ्याच्या फुलांचा पोशाख आणि गुलाब, झेंडू, चाफा यांसारख्या फुलांनी मंदिराला सुशोभित करण्यात आले. सरपाले फ्लॉवर्सचे सुभाष सरपाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही फुलांची भव्य आरास साकारली. उत्सवाच्या सुरुवातीला सकाळी उत्सव उपप्रमुख अक्षय हलवाई यांच्या हस्ते पारंपरिक लघुरूद्र करण्यात आला. त्यानंतर अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार आणि उत्सवप्रमुख महेंद्र पिसाळ यांच्या हस्ते श्रीमती लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सायंकाळी प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ व माजी विश्वस्त डॉ. विठ्ठल नेउरगांवकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे, खजिनदार युवराज गाडवे, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, सुनिल रुकारी, डॉ. पराग काळकर आणि राजेंद्र बलकवडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाविकांना चैत्र महिन्यातील विशेष प्रसाद म्हणून कैरीची डाळ आणि पन्हे वाटप करण्यात आले. श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, श्रीमत् वासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज, श्रीमाणिकप्रभू महाराज या दत्तमहाराजांच्या चार अवतारांच्या प्रतिमा तसेच कै. लक्ष्मीबाई आणि दगडूशेठ हलवाई यांच्या प्रतिमा देखील फुलांनी सजविण्यात आल्या आहेत. ही फुलांची आरास रविवार, २१ एप्रिलपर्यंत भाविकांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *