![]()
पुणे-सोलापूर रस्त्यावरील द्राक्ष संशोधन परिषदेसमोर एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी मांजरी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश नवनाथ कांबळे (वय 33, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. कुणाल राहुल चौगुले (वय 18) आणि सुरेश बाबुराव गायकवाड (वय 18, दोघे रा. लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कांबळे हे द्राक्ष संशोधन परिषदेसमोर त्यांच्या मालवाहू टेम्पोचे चाक बदलत असताना आरोपी दुचाकीवरून तेथे आले. कोणत्याही कारणाशिवाय आरोपींनी शिवीगाळ करत कांबळे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात कांबळे गंभीर जखमी झाले. त्यांनी मांजरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तपास करून चौगुले आणि गायकवाड यांना ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक धनाजीटोणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दहशत माजविणाऱ्या गुंडाला पोलिसांकडून अटक पुणे शहरातून तडीपार केल्यानंतरही बिबवेवाडी भागात दहशत माजविणाऱ्या एका गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश उर्फ ताऊ अर्जुन जोगन (वय 28, रा. शेळके वस्ती, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी जोगन याला पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातून 14 ऑक्टोबर 2025 रोजी दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले होते. तडीपार केल्यानंतरही जोगन शहरात परतला होता. बिबवेवाडीतील शेळके वस्तीत कोयता उगारून त्याने दहशत माजविली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. शहरात दहशत माजविणाऱ्या गुंडांना तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, काही सराईत गुंड तडीपारी आदेशाचा भंग करून शहरात वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा आदेशाचा भंग करणाऱ्या सराईतांविरुद्ध कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तडीपार केलेला सराईत गुंड शहरात आढळून आल्यास किंवा त्याने दहशत माजविल्याचा प्रकार दिसून आल्यास, नागरिकांनी तात्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Source link
पुण्यातील द्राक्ष संशोधन परिषदेसमोर तरुणावर कोयत्याने वार:मांजरी पोलिसांकडून दोघांना अटक, एकावर गुन्हा दाखल