Headlines

पुण्यात अतिवृष्टी, धरणांतून पाण्याचा मोठा विसर्ग:नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, पाणी पातळी वाढण्याची शक्यता




पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे खडकवासला, निरा देवघर, भामा आसखेड आणि पानशेत या चार प्रमुख धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता वाढवून १६ हजार २४७ क्युसेक करण्यात येणार आहे. पावसाचा जोर आणि धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गात पुन्हा बदल होण्याची शक्यता खडकवासला पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे. निरा देवघर धरण ९७.४२ टक्के भरले असून, या धरणातून निरा नदीत एकूण १२ हजार ६९७ क्युसेक पाणी सोडले जात आहे. यात सांडव्याद्वारे ११ हजार ९४७ क्युसेक आणि विद्युतगृहातून ७५० क्युसेक पाण्याचा समावेश आहे. भामा आसखेड धरणातून भामा नदीत सकाळी ७.३० वाजता ७ हजार ४२५ क्युसेकवरून ९ हजार ९०० क्युसेक विसर्ग वाढवण्यात आला आहे. पानशेत धरण ९८.८२ टक्के भरले आहे. या धरणाच्या जलविद्युतगृहातून ६०० क्युसेक विसर्ग सुरू असून, सांडव्यावरील विसर्ग सकाळी ८.३० वाजता वाढवून ३ हजार १९६ क्युसेक करण्यात आला. वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सांडव्यावरून २३,१२० क्युसेक आणि अतिवाहकाद्वारे १,१०० क्युसेक असा एकूण २४,२२० क्युसेक विसर्ग निरा नदीपात्रात सुरू करण्यात येणार आहे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि पाण्याची आवक लक्षात घेऊन हा विसर्ग कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाने नागरिकांना नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन केले आहे. नदीतील पंप, शेतीची अवजारे, इतर साहित्य आणि जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, सखल भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *