![]()
पुणे शहरात अमली पदार्थ विरोधी पथकाने मेफेड्रोन विक्री करणाऱ्यांविरोधात दोन स्वतंत्र कारवाया केल्या आहेत. या कारवाईत एकूण चार जणांना अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी एकूण 5 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पहिली कारवाई नाना पेठेतील एडी कॅम्प चौकात करण्यात आली. येथे मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या चौघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. नासीर रसूल शेख (वय 22), फराज नजीर शेख (वय 24, रा. सय्यदनगर, हडपसर) आणि जावेद हसन शेख (वय 24, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 71 ग्रॅम मेफेड्रोन, तीन दुचाकी आणि मोबाइल फोन असा एकूण 4 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसकर्मचारी अमोल सरडे यांना सात जण मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. आरोपींविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त हसन गौहर, सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, उपनिरीक्षक योगेश कोतकर, सहायक फौजदार विठ्ठल साळुंके, आशा भिंगारे, अमोल सरडे, अक्षय शिर्के, मद्देल, साळुंखे, राजे आणि गुंड यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. दुसरी कारवाई शिवाजीनगर भागातील संचेती चौकात करण्यात आली. येथे मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या आसिफ अब्दुल शेख (वय 26, रा. कासेवाडी, भवानी पेठ) याला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 9 ग्रॅम मेफेड्रोन, दुचाकी आणि मोबाइल फोन असा एकूण 1 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मेफेड्रोनची किंमत 27 हजार रुपये आहे. पोलिस कर्मचारी तुषार साळुंखे यांना दुचाकीस्वार शेख हा मेफेड्रोन विक्रीसाठी संचेती चौकात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले.
Source link
पुण्यात अमली पदार्थ विरोधी पथकाचा दणका:मेफेड्रोन प्रकरणात चौघे गजाआड; 5.92 लाखांचा मुद्देमाल जप्त