Headlines

पुण्यात निवृत्त ACP कडून सुनेचा छळ:डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पोलीस आयुक्तांकडे पाठपुरावा; नवीन कायद्यामुळे कारवाईत अडचण




पुणे शहरातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये एका ३० वर्षीय विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ झाल्याची तक्रार २० जून २०२६ रोजी उघडकीस आली आहे. पीडितेच्या सासरच्या मंडळींमध्ये निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) यांचा समावेश आहे. फिर्यादीचा विवाह २०२२ मध्ये झाला होता. लग्नाच्या वेळी पीडितेच्या आई-वडिलांनी मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने आणि लग्नाचा सर्व खर्च केला होता. तरीही, पती, सासू, सासरे आणि नणंदा वारंवार पैशांची मागणी करून तिला त्रास देत होते. पतीने इतर मुलींसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर टाकून तिला मानसिक त्रास दिला, तसेच तिचे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्यास भाग पाडले. या प्रकरणी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पुणे शहरातील पोलीस उपायुक्त विजयलक्ष्मी शिवणकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. भारतीय न्याय संहितेतील नवीन तरतुदींमुळे (कलम ४९८) आरोपीला अटक करण्यापूर्वी पूर्व सूचना देणे पोलिसांवर बंधनकारक झाले आहे. सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांमध्ये ही अट लागू होते, ज्यामुळे मारहाण किंवा छळ सत्य असला तरी कारवाई करणे अवघड झाले आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. डॉ. गोऱ्हे यांनी सुचवले की, कलम ४९८ लावण्यापूर्वी पीडितेला कुटुंबीयांकडून मिळालेल्या धमक्या आणि कटकारस्थानांचे अनुभव नोंदवून घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे तिने यापूर्वी तक्रार का दिली नाही, याची वस्तुस्थिती न्यायालय आणि न्याय यंत्रणेला व्यवस्थित समजू शकेल. तसेच, त्यांनी एप्रिल महिन्यात पोलीस महानिरीक्षक आणि महिला बाल कल्याण आयुक्तांसोबतच्या बैठकीत दिलेल्या सूचनांचा पुनरुच्चार केला. त्यानुसार, कलम ४९८ अंतर्गत गुन्हा दाखल करताना कौटुंबिक संरक्षण अधिकाऱ्यांकडेही केस नोंदवून दिवाणी कायद्यानुसार संपत्तीत वाटा किंवा राहण्याचा अधिकार कसा मिळू शकेल, याबाबत महिला तक्रारदारांना माहिती द्यावी. या संदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी डीसीपी विजयलक्ष्मी शिवणकर यांचे लक्ष वेधले असून, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनाही निवेदन दिले आहे. डीसीपी शिवणकर यांनी महिलांना सुरक्षा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, सर्व वस्तुस्थितीची माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यांनी डॉ. गोऱ्हे यांनी दिलेल्या सूचनांचा अंतर्भाव करण्याचे आणि पीडित मुलीचे समुपदेशन करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *