![]()
महिलांवरील तसेच महाविद्यालयीन तरुणींवर लैंगिक अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. पुण्यातील एका महाविद्यालयीन तरुणीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सलग एक वर्ष या तरुणीवर चार मित्रांकडून लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत या नराधमांनी तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे समजते. अखेर या त्रासाला कंटाळून तरुणीने वाघोली पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणीच्या फिर्यादीवरुन वाघोली पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. फरहान शेख, फजल शेख, रेहान शेख आणि साहिल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही पुण्याच्या विमान नगर परिसरात वास्तव्यास आहे. 2025 मध्ये या तरुणीने पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. याच ठिकाणी तिची ओळख या प्रकरणातील मुख्य आरोपी फरहान शेख याच्याशी झाली. पुढे या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. मात्र, याच विश्वासाचा आणि मैत्रीचा गैरफायदा घेत फरहानने आपल्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप या महाविद्यालयीन तरुणीने केला आहे. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, केवळ एकानेच नव्हे तर या प्रकरणातील चौघांनी मिळून गेल्या वर्षभरापासून विविध ठिकाणी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले आहेत. या खळबळजनक घटनेची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांनी तत्काळ कारवाई केली असून प्रकरणातील चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे. मात्र, शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात उघडकीस आलेल्या या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई लोकलमध्ये महिलांच्या डब्यात मद्यपीचा धिंगाणा मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अंबरनाथहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये उल्हासनगर ते विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका मद्यपीने थेट महिलांच्या डब्यात घुसून जोरदार धिंगाणा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे डब्यातील महिला प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर विठ्ठलवाडी स्थानक येताच इतर प्रवाशांनी सतर्कता दाखवत या मद्यपीला पकडले आणि रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. सुदैवाने यात कोणताही अनर्थ घडला नसला तरी, या खळबळजनक घटनेमुळे रेल्वे प्रवासातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Source link
पुण्यात महाविद्यालयीन तरुणीवर चार मित्रांकडून वर्षभर सामूहिक अत्याचार:अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत कृत्य, चौघांना अटक